
सामना प्रतिनिधी । मुंबई
अरबी समुद्रातील नियोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उंचीवरून मंगळवारी विधानसभेत जोरदार रणकंदन झाले. स्थगन प्रस्तावाद्वारे शिवस्मारकाचा विषय उपस्थित केला जात असतानाच आमदार अतुल भातखळकरांचा अतिउत्साह भाजपच्या अंगाशी आला. या विषयाला ‘भलता’ म्हणत केलेल्या विधानावर शिवसेना सदस्यांनी त्यांना सभागृहाची माफी मागण्यास भाग पाडले. तर विरोधी पक्षांकडून भातखळकरांच्या निलंबनाची मागणी होत असताना काही सदस्यांनी राजदंडच पळवला. यामुळे झालेल्या गोंधळात सभागृहाचे कामकाज चार वेळा तहकूब करण्यात आले. अखेर अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी भातखळकरांना समज देत वादावर पडदा टाकला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रात उभ्या राहत असलेल्या पुतळ्याची उंची कमी करून तलवारीची उंची वाढविण्यात आल्याबाबत काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी स्थगन प्रस्ताव उपस्थित केला. या प्रस्तावावर उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उभे राहत अताना अतुल भातखळकर यांनी हात वर केल्याने त्यांना बोलण्याची संधी देण्यात आली. मात्र भातखळकर यांनी विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत असलेल्या विषयाबाबत ‘भलता’ शब्द वापरला. यावेळी हा शब्द छत्रपती शिवरायांच्या विषयावरच वापरल्याचा आक्षेप नोंदवत विरोधी बाकावरील सदस्यांनी त्यांच्या निलंबनाची जोरदार मागणी केली. याच गोंधळात विरोधी पक्षातील आमदार शशिकांत शिंदे, अब्दुल सत्तार, अस्लम शेख यांनी राजदंड उचलला. राजदंड उचलून तो सभागृहाबाहेर घेऊन गेले. या सर्व गोंधळातच सभागृहाचे कामकाज चार वेळा तहकूब झाल्यानंतर विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी अध्यक्षांच्या दालनात या विषयावर बैठकीची मागणी केली. या बैठकीनंतर सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यावर अध्यक्षांनी अतुल भातखळकर यांनी यापुढे वक्तव्य करताना विचार करून वक्तव्य करण्याबाबत समज दिली आणि वादावर पडदा टाकला.
काय म्हणाले भातखळकर…
मूळ विषय पत्रिकेतील कामकाज बाजूला पडून सभागृहात ‘भलते’च विषय काढले जातात!
शिवसेना-भाजप आमनेसामने
ही मागणी होत असताना शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयावर जर भातखळकर यांनी आक्षेपार्ह विधान केले असेल तर याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी केली. शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी जर शिवरायांच्या विषय जर कुणाला भलता सलता वाटत असेल तर तो घोर अवमान असून या प्रकरणी सभागृहाची माफी मागावी अशी मागणी केली. त्यापाठोपाठ अनिल कदम यांनीही माफीची मागणी लावून धरली. शिवसेना ही मागणी करीत असतानाच योगेश सागर हे शिवसेनेच्या सदस्यांच्या दिशेने धावत आले आणि हातवारे करून विरोध करण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिवसेनेच्या आमदारांनी थेट वेलमध्ये जाऊन त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. यावेळी राडा होण्याची वेळ आली असतानाच परिवहनमंत्री दिवाकर रावते, संसदीय कामकाजमंत्री गिरीष बापट, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी मध्यस्थी करीत शिवसेना सदस्यांना शांत केले. तरीही भातखळकरांच्या मागणीवर आमदार ठाम आमदारांनी राहत वेलमध्ये धाव घेतली. अखेर अतुल भातखळकर यांनी ‘भलता’ शब्द आपण पृथ्वीराज चव्हाण यांच्याविषयी वापरला असल्याचे सांगत आपले वक्तव्य मागे घेतले आणि सभागृहाची माफी मागितली.
तिजोरी रिकामी झाली तरी चालेल; शिवस्मारकाची उंची कमी नको!
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहे. त्यामुळे या स्मारकाची जी उंची उद्घाटनावेळी ठरविण्यात आली होती तीच उंची कायम ठेवा, या दैवतासाठी राज्याची तिजोरी रिकामी झाली तरी त्याची पर्वा करू नका, अशी मागणी सुनील प्रभू यांनी केली. तर राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी उभे राहत छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या प्रत्येक मुद्दय़ावर शिवसेना कायम आग्रही राहिली आहे असे सांगत तुमचे राज्य १५ वर्षे असताना तुम्ही काय केले, त्याचा लेखाजोखा द्या, असा सवाल त्यांनी विरोधकांना केला.
पुतळय़ाची उंची कमी करणार नाही
मुंबई येथील अरबी समुद्रात छत्रपती शिकाजी महाराजांच्या उभारण्यात येणाऱया स्मारकात जगातील सर्कात उंच पुतळा छत्रपती शिकाजी महाराजांचा असेल. पुतळय़ाची उंची कमी केली नाही, असे मुख्यमंत्री फडणकीस यांनी सांगितले. हा पुतळा समुद्रात उभारण्यात येणार असल्याने पुतळय़ाचे डिझाईन करताना समुद्रातील कारे, लाटा यांचा किचार करून आराखडा तयार करण्यात आला आहे. या स्मारकाविषयीच्या सर्व परवानग्या मी मिळवल्या, मात्र इतकी वर्षे तुम्ही सरकारमध्ये असताना तुम्हाला हे जमले नाही म्हणून तुमच्या पोटात दुखत आहे, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला.




























































