
सामना प्रतिनिधी, न्हावाशेवा
मागील वर्षभरापासून चिरनेर गावात एका माकडाने उच्छाद मांडला असून गावातील नागरिक या माकडचेष्टांना वैतागले असून वनविभागाने या माकडांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.
चिरनेर परिसरात मोठ्या प्रमाणात माती उत्खननासाठी झाडे आणि जंगल तोडले जात असल्याने जंगलातील माकडे, वानरे यांनी आपला मोर्चा जवळच्या गावांकडे वळविला आहे. चिरनेर गावात अशाच तऱ्हेने माकडे आणि वानरे गावात शिरली आहेत. ही माकडे एखाद्याच्या घरात शिरून घरातील वस्तूंचे नुकसान करतात. ही माकडे सर्व्हीस वायरवर उड्या मारत असल्याने अनेकांचा रोज विज पुरवठा खंडीत होतो. ग्रामपंचायतीने अनेक वेळा वनविभागाकडे या वानराचा बंदोबस्त करावा अशी मागणी करून देखिल वन विभागाचे अधिकारी आमच्याकडे त्यासाठी अर्थिक तरतूद नसल्याचे सांगून वेळ मारून नेत आहेत.
चिरनेर परिसरात होत असलेल्या वृक्षतोडीकडे आणि वन विभागातील जागेवरील उत्खननाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून वन विभागाचे अधिकारीच या वन्य जीवांच्या जीवावर उठल्याचे दिसून येत आहे. गावातील लोकांना वर्षभरापासून त्रास देणारा माकड पकडण्यासाठी यांच्याकडे अर्थिक तरतूद नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. चिरनेर ग्रामपंचायत आणि येथिल नागरीकांनी ही माकडे पकडण्यासाठी मुंबई येथील तीन जणांचे पथक बोलाविले होते. त्यांनी या माकडांना पकडण्यासाठी सापळे लावले होते मात्र त्यात त्यांना यश आले नाही.


























































