चेन्नईत 18 वर्षांवरील व्यक्तींना कोरोनावरील लस टोचण्यास ‘गुपचूप’ सुरूवात?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरामध्ये कोरोनावरील लस टोचण्याची व्यापक मोहीम सुरू झाली आहे. सध्या 60 वर्षांवरील व्यक्ती आणि 45 पेक्षा अधिक वय आणि सहव्याधी असलेल्या व्यक्तींनाच ही लस दिली जात आहे. मात्र चेन्नईमध्ये 18 वर्षांवरील व्यक्तींनाही लस देण्यास सुरुवात झाली आहे. या लसीकरण मोहिमेपूर्वी तज्ज्ञांनी संपूर्ण देशात 18 वर्षांवरील व्यक्तींना लस द्यावी अशी सूचना केली होती, मात्र त्याऐवजी 60 वर्षांवरील व्यक्तींना प्राधान्याने लस देण्याचं ठरवण्यात आलं होतं. चेन्नईमध्ये तिथल्या महापालिकेद्वारे चालवण्यात येणाऱ्या आरोग्य केंद्रांवर 18 वर्षांवरील व्यक्तींना लस दिली जात असल्याचं कळालं आहे.

चेन्नईतील आरोग्य केंद्रांवर ज्या लोकांना लस दिली जात आहे त्यांच्याबाबत टाईम्स ऑफ इंडियाने एक बातमी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये म्हटलंय की काही आरोग्य केंद्रं अशी आहेत, जिथे 45 वर्षांवरील सगळ्यांना ही लस दिली जात आहे. तर काही केंद्र अशी आहे जिथे सहव्याधी असलेल्या आणि 45 पेक्षा जास्त वय असलेल्यांना लस दिली जात आहे. काही केंद्रांवर 30 वर्षांवरील व्यक्तींना दुपारी 2 नंतर बोलावण्यात आले होते. लस वाया जाण्यापेक्षा आम्ही तुम्हाला देऊ असं सांगून 30 वर्षांवरील व्यक्तींना आरोग्य केंद्रावर बोलावण्यात आलं होतं. गेल्या आठवड्यात या केंद्रावर सरसकट सगळ्यांना लस टोचली जाऊ लागली होती.

चेन्नईतील मनपा प्रशासनाकडे दिवसाला 60 हजार व्यक्तींना लस देण्याची व्यवस्था आहे. शनिवारी ते 35,215 जणांना लस देऊ शकले होते. सोमवारी हा आकडा आणखीनच घसरला. त्या दिवशी 18018 जणांनीच लस घेतली होती. कोवॅक्सिनची कुपी एकदा उघडली की त्यातील लसींचे 20 डोस 4 तासात संपवावे लागतात. कोविशिल्डची कुपी उघडल्यास त्यात 10 डोस असतात जे 4 तासांत संपवावे लागतात. जर केंद्र सरकारने निश्चित केलेल्या निकषांनुसार माणसे केंद्रावर लस घ्यायला आली नाही तर हे डोस वाया जाण्याची शक्यता असते. यामुळे इथल्या आरोग्य केंद्रावर 18 वर्षांवरील व्यक्तींनाही लस टोचायला सुरूवात केली असावी असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. लस वाया जाण्यापेक्षा ती लोकांना टोचली गेली तर ते जास्त फायदेशीर असेल असं मत साथआजार तज्ज्ञ डॉ.सुब्रमण्यम स्वामीनाथन यांनी व्यक्त केलं आहे. चेन्नई महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने म्हटलंय की त्यांनी फ्रंटलाईन वर्करची व्याख्या विस्तारली आहे. यामध्ये त्यांनी आता रेस्टॉरंटमध्ये काम करणारे, टॅक्सी-रिक्षावाले, घरकाम करणारे, मॉल किंवा इमारतींची सुरक्षा करणारे सुरक्षारक्षक यांचाही समावेश केला आहे.