चेतन शर्मांचा तडकाफडकी राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका चॅनलने केलेले स्टिंग ऑपरेशन चेतन शर्मा यांना भलतेच महागात पडले आहे. त्या ऑपरेशननंतर त्यांची हिंदुस्थानी क्रिकेट संघाच्या निवड समिती अध्यक्ष पदावरून हकालपट्टी होण्याचे संकेत होते; पण त्यापूर्वीच आज त्यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यांचा राजीनामा बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी स्वीकारला आहे.

शर्मा यांना हिंदुस्थानच्या निवड समितीचे अध्यक्ष पद दुसऱयांदा भूषवण्याची संधी लाभली होती. बीसीसीआयने ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या टी-20 विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर शर्मांची निवड समितीच बरखास्त केली होती. मात्र दुसरी निवड समिती नियुक्त करताना शर्मा यांना पुन्हा संधी देण्यात आली होती. मात्र स्टिंग ऑपरेशनमध्ये सापडलेल्या शर्मांचा आपल्या तोंडावर ताबा न राहिल्याने त्यांनी निवड समिती आणि बीसीसीआयमधील पडद्यामागील गुपिते चव्हाटय़ावर आणली. सौरव गांगुली आणि विराट कोहली यांच्यात झालेला वाद, दुखापतग्रस्त खेळाडू इंजेक्शन घेऊन कसे पुनरागमन करतात याबाबत व्यक्तव्ये केली.

शिवसुंदर दास नवे अध्यक्ष?
चेतन शर्मा यांच्या राजीनाम्यानंतर निवड समितीचे नवे अध्यक्ष म्हणून माजी कसोटीपटू शिवसुंदर दास यांचे नाव समोर आले आहे. सध्या हिंदुस्थान दुसरी कसोटी खेळत असून शेवटच्या दोन कसोटींसाठी संघ निवडण्यासाठी दास यांच्याकडे निवड समितीचे अध्यक्ष पद सोपविण्याची तयारी बीसीसीआयने केल्याचे सूत्रांकडून कळले आहे.