
दिग्गजांच्या सभांनी गाजलेले आणि सांस्कृतिक-राजकीय वारसा लाभलेले दादर पश्चिम येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज मैदान आता आकर्षक रोषणाईने उजळणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदार निधीमधून हे काम केले जाणार आहे. मैदानातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, राज्याभिषेक शिल्प आणि माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यालाही रोषणाई करण्यात येणार आहे. पालिकेच्या या महत्त्वाकांक्षी प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज मैदान स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक राजकीय मेळाव्यांचे साक्षीदार राहिले आहे. हे मैदान 28 एकर परिसरात पसरले असून त्याचा बाह्य परिघ सुमारे 1.2 किमी आहे. या मैदानाच्या फुटपाथवर आकर्षक रोषणाई करण्यासाठी आवश्यक असणारा निधी वापरण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पत्र महापालिकेला प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी मैदानाला भेट देऊन रोषणाईचे काम प्राधान्याने करण्याचे निर्देशही दिले आहेत. शिवाय सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनीदेखील तातडीने काम करण्यासाठी संबंधित विभागास पत्र दिले. दरम्यान, लवकरच हे काम सुरू होणार असून सर्व दिवस रोषणाई राहणार असल्याची माहिती सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.
रंगीबेरंगी दिवे, एलईडी लाईट आकाशकंदील
छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या सी. रामचंद्र चौकपासून वसंत देसाई चौकापर्यंत इल्युमिनीशन (विद्युत रोषणाई) करण्यात येणार आहे. यामध्ये विविध रंगाचे आकाशपंदील, डेकोरेटिव्ह बोलार्ड, एलईडी लाईट्स, विविध रंगाचे फ्लड लाईट, गोबो प्रोजक्शन लाईट, भूमिगत लाईट व मशाल लाईट लावण्याचे काम केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मैदानाच्या विद्युत रोषणाईकरिता 1 कोटी 21 लाख 24 हजार 470 रुपये खर्च करण्याच्या खर्चास स्थायी समितीने आज मंजुरी दिली.
मैदानाचे सौंदर्यीकरण प्रगतिपथावर
पालिकेच्या माध्यमातून मैदानाच्या नूतनीकरणात हिरवेगार नैसर्गिक गवत बहरणार असून दर्जेदार वॉकिंग ट्रकही बनवला जाणार आहे. शिवाय या ठिकाणच्या 100 वर्षांपूर्वीच्या हेरिटेज प्याऊचे नूतनीकरण करून पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पाणी उपलब्धतेसाठी या ठिकाणी पाच ठिकाणी 35 रिंग वेल (छोटय़ा विहिरी) तयार करण्यात आल्या आहेत.

























































