सीमा बांधवांचा रोष शांत करण्यासाठी मुख्यमंत्री निधीचा लाभ देण्याचा प्रयत्न, धर्मादाय देणगी निधी नियमात सुधारणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटकने सीमा भागाचा लचका तोडण्याचे कारस्थान सुरू केल्यामुळे मिंधे सरकारच्या विरोधात रोष निर्माण झालेला आहे. त्यामुळे आता सीमा भागातील बांधवांचा रोष शांत करण्यासाठी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील विविध संस्था आणि संघटनांना मुख्यमंत्री निधीतून 10 कोटींची मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घाईघाईने घेतला आहे.

यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने आज मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधी प्रशासनासंबंधीच्या नियमात सुधारणा करणारा शासन आदेश जारी केला. या निर्णयानुसार सीमाभागातील 865 गावांमधील सामाजिक, शैक्षणिक, धर्मादाय, सांस्कृतिक तसेच निम सार्वजनिक संस्था आणि संघटनांनादेखील मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीतून अर्थसहाय्य मिळणार आहे.

सीमाप्रश्नी नुकत्याच ‘सह्याद्री’ अतिथीगृहात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमाभागातील मराठी बांधव आणि संस्था यांना महाराष्ट्राकडून अर्थसहाय्य देण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे 24 नोव्हेंबर रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला. मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीमधून मुख्यमंत्र्यांच्या स्वेच्छाधिकारातून राज्यातील विविध संस्था, संघटना यांना अर्थसहाय्य करण्याची तरतूद आहे. नव्या शासन निर्णयात सुधारणा करून आता सीमाभागातील 865 गावांचा समावेश करण्यात आला आहे.