
शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर आज उद्धव ठाकरे मंत्रालयात पदभार स्वीकारण्यासाठी येणार अशी घोषणा होताच मंत्रालयातील कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचा उत्साह संचारला होता. यापूर्वीच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी कर्मचाऱ्यांमध्ये अशी ओढ कधीही सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालेली नव्हती. उद्धव ठाकरे यांच्या मोटारींचा ताफा मंत्रालयात शिरताच कर्मचाऱ्यांनी तळमजल्यावर धाव घेतली. उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात येताच सर्वप्रथम मंत्रालयातील छत्रपती शिवाजी महाराज तसेच ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर व जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर उद्धव ठाकरे सहाव्या मजल्यावरील दालनाकडे रवाना झाले. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या सोबत मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, डॉ. नितीन राऊत, आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह खासदार विनायक राऊत, आमदार दिवाकर रावते आदी उपस्थित होते.
उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री
सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्र्यांच्या दालनाचा दरवाजा फुलांनी सजवला होता. दरवाजावर उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी पाटी दिमाखात झळकत होती. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या दालनात प्रवेश केल्यावर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे तसेच मुख्यमंत्री कार्यालयाच्या महिला अधिकाऱ्यांनी औक्षण करून उद्धव ठाकरे यांचे स्वागत केले. राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, प्रधान सचिव भूषण गगराणी आदींनी प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारला.
मोबाईल कॅमेऱ्यांचे फ्लॅश चकाकले
उद्धव ठाकरे यांचे मोबाईलमध्ये फोटो टिपण्यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये चढाओढ लागली होती. मंत्रालयीन कर्मचाऱ्यांनी तसेच शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. मोबाईलमधील कॅमेऱ्यांचे फ्लॅश क्षणाक्षणाला लखाखत होते.
लता मंगेशकर यांच्या प्रकृतीची विचारपूस
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सायंकाळी उशिरा ब्रीच कॅण्डी रुग्णालयात जाऊन गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. लता मंगेशकर यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.
























































