
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
जास्त क्रिकेट खेळल्याने समजूतदारपणा येतोच असे नाही, असे म्हणत निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी टीकाकारांनी चोख उत्तर दिले आहे. काही दिवसांपूर्वी हिंदुस्थानचे माजी खेळाडू सुनील गावसकर यांनी कमी सामने खेळल्याने निवड समिती सदस्य कमकुवत असल्याचा आरोप लगावला होता. या आरोपांना आता प्रसाद यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
निवड समितीची क्षमता आणि अनुभवाबाबत सध्या चर्चा सुरू आहे. याबाबत विचारण्यात आले असता एमएसके प्रसाद म्हणाले की, निवड समितीतील सर्वच सदस्यांनी हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केलेले आहे. आमची निवड होण्यामागील हा देखील एक मापदंड होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट व्यतिरिक्त आम्ही प्रथम श्रेणीचे 477 सामने खेळलेले आहेत. आम्ही सर्वांनी मिळून एकत्र 200 पेक्षा जास्त प्रथम श्रेणी लढती खेळलेल्या आहेत. हे आकडे पाहिल्यानंतर अजूनही तुम्हाला असे वाटते का एक खेळाडू आणि निवड समिती सदस्य म्हणून आम्हाला कौशल्यवान खेळाडूंची ओळख पटणार नाही? असा सवालही एमएसके प्रसाद यांनी उपस्थित केला.
निवड समितीतील सर्व सदस्यांनी मिळून फक्त 13 कसोटी लढती खेळल्या आहेत याकडे एमएसके प्रसाद यांचे लक्ष वेधले असता त्यांनी इंग्लंड आणि वेस्ट क्रिकेट बोर्डाचे मुख्य निवड समिती अध्यक्ष एड स्मिथ यांचे उदाहरण दिले. एस स्मिथ यांनी फक्त एक कसोटी लढत खेळली असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य निवड समिती अध्यक्ष ट्रेवॉर होन्स यांनी फक्त सात कसोटी लढती खेळल्या आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. या देशांमध्ये आंतरराष्ट्रीय अनुभव हा मुद्दा बनत नाही मग आपल्या देशात असे का? जास्त क्रिकेट खेळल्याने समजूतदारपणा येतो असे नाही, असेही ते म्हणाले. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणे हा मापदंड असता तर राज सिंह डुंगरपूर कधीही निवड समिती अध्यक्ष बनले नसते, कारण त्यांनी तर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही, असेही एसएमके प्रसाद यावेळी म्हणाले.






























































