
देशाने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करूनही भुदरगड तालुक्यातील तळकोकण व घाटमाथ्यावर शिवपूर्व काळापासून रांगणा किल्ल्याच्या गडकऱ्यांना अनेक प्राथमिक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. जाण्यासाठीच रस्ता नसल्याने पावसाळ्यात रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी रुग्णालयात नेण्यासाठी कधी घोंगडी, कधी पाळणा, तर कधी डालग्यातून नेण्याची वेळ येते.
पश्चिम भुदरगडमधील दुर्गम असणाऱ्या भट-तांब्याचीवाडीपर्यंत पक्का रस्ता असून, तिथून पुढे जवळजवळ नऊ ते दहा किलोमीटर पूर्ण सह्याद्रीच्या घनदाट जंगलातून पायपीट करत जावे लागते. पूर्वीच्या काळी वीज नव्हती. मात्र, आता विजेची सोय झाली असून, महत्त्वाची सेवा म्हणजे रस्ता आणि रुग्णसेवा होण्याची हे गाव वाट पाहत आहे. अनेकवेळा या गावातील ग्रामस्थ प्राथमिक गरजांसाठी सह्याद्रीचा उंच-कडा उतरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महादेवाचे केरवडे व नारूळ या गावी पायी जातात. त्याच रस्त्याने परत घाटमाथ्यावर येतात. हा अतिशय अवघड टप्पा म्हणावा लागेल. या दृष्टचक्रातून सुटण्यासाठी चिक्केवाडीसाठी खडीकरण डांबरीकरण रस्ता लवकरात लवकर करण्याची येथील ग्रामस्थांनी मागणी केली आहे.
अनेक गावांमध्ये समाज मंदिर, सांस्कृतिक भवन बांधली जातात. मात्र, या गावांमध्ये अजून अशी कोणतीही सुविधा नाही. तेथील कोणतेही घर आरसीसी नाहीत. कसातरी आडोसा केला जातो. अतिवृष्टीच्या काळात सांस्कृतिक भवन असल्यास त्यांना मोठा आधार मिळू शकतो. ग्रामदेवता भालदेवीचे मंदिर असून, गावापासून जवळजवळ एक किलोमीटर लांब आहे, तसेच तेथेच त्यांना आवश्यक तेवढी शेतजमीन कर्नाटक सरकारच्या धरतीप्रमाणे वितरित करावी जेणेकरून त्यांच्या पोटापाण्याचा आणि जनावरांच्या वैरणीचा प्रश्न मार्गी लागेल. इतर गावाप्रमाणे आपलाही विकास होण्याची अशा निर्माण होईल. या गावाला कायमस्वरूपी रस्ता झाल्यास गडाच्या तालुक्यातील सर्व गावे पक्का-रस्त्याने जोडली जाऊन राज्यामध्ये भुदरगड तालुक्याची एक विकासाचे नवीन मॉडेल म्हणून ओळख निर्माण होईल.
घाटमाथ्यावरील अतिशय दुर्गम म्हणून ओळखला जाणारा पाटगाव बॅकवॉटरला समांतर प्रतिमहाबळेश्वर म्हणून ओळखला जाणारा हनुमंताचा कोकणकडा हनुमंता मंदिर, नंददेवी मंदिर, रांगणा किल्ला ही सर्व ठिकाणे पक्क्या रस्त्याने जोडून त्यांचा केरळमधील वनपर्यटन या संकल्पनेवर विकास व्हावा. – नानाश्री पाटील, गड-दुर्ग अभ्यासक