चीनचे अडेलतट्टू धोरण कायम; मसूदला पाठिशी घालण्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पेइचिंग

जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याबाबत संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद लवकरच निर्णय घेणार आहे. मात्र, या मुद्द्यावर चीनचे अडेलतट्टू धोरण कायम आहे. या प्रकरणी चीन मसूदला पाठिशी घालण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सर्वांना मान्य होईल आणि कोणावरही अन्याय होणार नाही अशी आमची भूमिका असून आम्ही जबाबदार राष्ट्राची भूमिका पार पाडू असे चीनने स्पष्ट केले आहे. याआधीही मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या हिंदुस्थानच्या प्रयत्नांना 2017 मध्ये चीनने खोडा घातला होता. या प्रस्तावाला विरोध करण्याचे संकेत चीनने बुधवारी दिले आहेत.

मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत 1267 कलमानुसार फ्रान्स, ब्रिटन आणि अमेरिकेने 27 फेब्रुवारीला दाखल केला आहे. त्यावर 24 तासांच्या आत निर्णय येण्याची शक्यता असतानाच त्यात खोडा घालण्याचे संकेत दिले आहेत. या समस्येवर सर्वांना मान्य होईल असा मार्ग शोधण्याची गरज चीनने व्यक्त केली आहे. मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी चीनने आणखी सबळ पुराव्यांची मागणी केली आहे. 2017 मध्येही चीनने मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या हिंदुस्थानच्या प्रयत्नांमध्ये खोडा घातला होता. मसूद आजारी असून त्याची संघटना कार्यरत नाही. तसेच तो जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या नाही, असे चीनने स्पष्ट केले होते.

या मुद्द्यावर चीन जबाबदार राष्ट्राची भूमिका पार पाडेल, या प्रस्तावावर होणाऱ्या चर्चेत चीन सहभागी होणार असून आमची मते स्पष्टपणे मांडणार असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लु कांग यांनी सांगितले. सुरक्षा परिषदेत विशेषाधिकार असलेला चीन सदस्य आहे. ते या अधिकाराचा वापर करून मसूदला पाठिशी घालत आहेत. सर्वांना मान्य होईल असा मार्ग शोधण्यावर चीनने भर दिला आहे. चीनने या प्रस्तावाला विरोध केला नाही तर येत्या 24 तासात मसूदला आतंरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात येईल. अमेरिका आणि फ्रान्सला हिंदुस्थानने पुलवामा दहशतवादी हल्ल्याशी संबंधित महत्त्वाचे दस्तावेज दिले आहेत. त्यामुळे मसूदविरोधात ठोस पुरावे सादर करण्यास मदत होणार आहे.