
सामना ऑनलाईन । बीजिंग
तैवान आणि हिंदुस्थानचा अविभाज्य भाग असलेला अरुणाचल प्रदेश नसलेले आपल्याकडील तब्बल 3 लाख जागतिक नकाशे चीनच्या सीमा शुल्क अधिकार्यांनी नष्ट करण्याचे आदेश दिले आहेच. हे सर्व नकाशे चीनमध्ये बनवण्यात आले होते आणि नेदरलँडला पाठवण्यात येणार होते. या प्रकरणी चीनने चौघांविरोधात खटला दाखल केला आहे.
याआधी गेल्या महिन्यामध्ये चीनच्या सीमा शुल्क अधिकार्यांनी 30 हजार जागतिक नकाशे नष्ट केल्याचे आता उघड झाले आहे. चीनच्या म्हणण्यानुसार अरुणाचल प्रदेश हा हिंदुस्थानचा नव्हे, तर दक्षिण तिबेटचा भाग आहे. चीन सरकार तैवानलाही आपलाच हिस्सा मानत आहे. याचमुळे हिंदुस्थानच्या राजकीय व्यक्तींच्या अरुणाचलच्या दौऱ्याचा चीनन सातत्याने विरोध केला आहे.
हिंदुस्थान आणि चीनमध्ये 3,488 किलोमीटरची सीमारेषा आहे. दोन्ही देशांमध्ये सीमाप्रश्नी उच्च अधिकाऱ्यांच्या 21 बैठकही झाल्या आहेत. अरुणाचल प्रदेश हा भाग आपलाच असल्याचे म्हणणे चीनच्या शिष्टमंडळाने अनेकदा हिंदुस्थानी नेत्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र अरुणाचल हा आमचा अविभाज्य घटक असल्याचे हिंदुस्थानने त्यांना वेळोवेळी ठणकावले आहे. तसेच राजकीय नेत्यांनी वेळोवेळी येथे दौरेही केले आहेत.
ग्लोबल टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, चीनच्या सीमा शुल्क अधिकार्यांनी एका कार्यालयावर धाड घालून 2,64,983 जागतिक नकाशे जप्त केले. यानंतर हे सर्व नकाशे नष्ट करण्यात आले. हे सर्व नकाशे इंग्रजीमध्ये होते आणि नेदरलँड या देशामध्ये पाठवण्यात येणार होते. जानेवारीमध्ये ही कारवाई केल्याचे आता उघड झाले आहे. चीनने आतापर्यंत 3 लाखांपेक्षा जास्त नकाशे जप्त करून नष्ट केले आहेत, तसेच येत्या काळात चीनच्या सार्वभौमत्वाला धक्का पोहोचवणारे नकाशे पुन्हा आढळल्यास ते देखील नष्ट करण्यात येतील असे सीमा शुल्क अधिकारी वाँग यांनी सांगितले.


























































