जनगणेच्या नावाखाली होणाऱ्या सायबर फसवणुकीपासून सावधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरात एप्रिल २०२६ पासून जनगणना प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू झाली असून चिपळूण शहरात देखील घरांची यादी करण्याचे काम १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत राबविण्यात येत आहे. जनगणना ही राष्ट्रीय कर्तव्याची प्रक्रिया असली तरी या नावाखाली नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी सायबर भामटे सक्रिय होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहाण्याचे आवाहन केले आहे.

या कामासाठी शहरात ९१ प्रगणक, १४ सुपरवायझर आणि १४ डीबीजे प्राध्यापक पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत. तसेच शहरातील सरकारी शाळा व हायस्कूलमधील शिक्षकांचाही या प्रक्रियेत समावेश करण्यात आला आहे. चिपळूण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय जाधव हे चार्ज ऑफिसर म्हणून काम पाहात असून उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे हे सहाय्यक चार्ज ऑफिसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.

प्रशासनाने नागरिकांना अधिकृत प्रगणकाची ओळख पटविण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. प्रत्येक प्रगणकाकडे केंद्र सरकार किंवा जिल्हा प्रशासनाचे अधिकृत ओळखपत्र असणार आहे. त्यावर भारत सरकारच्या Registrar General & Census Commissioner India, ‘यांचा लोगो, अधिकृत शिक्का किंवा होलोग्राम असणार आहे. तसेच डिजिटल जनगणनेमुळे ओळखपत्रावरील क्युआर कोड स्कॅन करून संबंधित प्रगणकाची माहिती पडताळता येणार आहे. कार्डवर जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार यांची स्वाक्षरी आणि शिक्का असल्याची खात्री करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खरे प्रगणक हे टॅब किंवा मोबाईलसह येणार असून त्यामध्ये अधिकृत Census ॲप असणार आहे. त्यांच्या जवळ ‘भारताची जनगणना २०२६ २७’ असे छापलेली निळ्या रंगाची बॅग किंवा फोल्डर असणार आहे.

जनगणना प्रक्रियेत कुटुंबातील सदस्यांची संख्या, शिक्षण, व्यवसाय, तसेच घरातील पाणी, वीज, शौचालय यांसारख्या सोयी सुविधांबाबत एकूण ३३ प्रश्न विचारले जाणार आहेत. मात्र कोणताही अधिकृत प्रगणक नागरिकांकडे, बँक खात्याचा तपशील, आधार किंवा पॅन लिंक, पिन, सीवीवी अथवा कोणत्याही प्रकारचे शुल्क मागणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

कोणत्याही व्यक्तीबाबत संशय आल्यास नागरिकांनी तातडीने तहसील कार्यालय, ग्रामपंचायत किंवा नगरपालिका प्रशासनाशी संपर्क साधावा. खात्री झाल्याशिवाय अनोळखी व्यक्तींना घरात प्रवेश देऊ नये तसेच शक्य असल्यास शेजाऱ्यांच्या उपस्थितीतच माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, ज्या नागरिकांनी se.census.gov.in या संकेतस्थळावर स्वतःची माहिती आधीच भरली आहे, त्यांनी प्रगणकाला फक्त ११ अंकी SE ID द्यावी. त्यामुळे वेळेची बचत होण्यासोबतच वैयक्तिक माहितीची सुरक्षितताही वाढणार आहे. सायबर फसवणुकीपासून सावध राहाण्याचे आवाहन करताना, कोणतीही फसवणूक झाल्यास नागरिकांनी तातडीने १९३० या सायबर क्राईम हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.