सिडकोच्या 1 हजार 100 घरांची लॉटरी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 सामना प्रतिनिधी । नवी मुंबई

घरांच्या शोधात असलेल्या नागरिकांना सिडकोने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सुखद धक्का दिला आहे. तळोजा, खारघर, घणसोली, कळंबोली आणि द्रोणागिरीमध्ये एक हजार 100 घरांची लॉटरी सिडकोने जाहीर केली आहे. या घरांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून योजनेची सोडत येत्या 14 फेब्रुवारी रोजी काढण्यात येणार आहे. ही सर्व घरे खुल्या वर्गासाठी आहेत.

सिडकोने नुकत्याच काढलेल्या 15 हजार घरांच्या लॉटरीला नागरिकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला होता. मात्र त्या सोडतीमध्ये अनेकांना घरे मिळाली नाहीत तर काहींना सोडतीमध्ये सहभागी होता आले नाही. त्यांच्यासाठी ही अकराशे घरांची लॉटरी तातडीने जाहीर करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी व्यक्त केली आहे.

पुन्हा नोंदणीची गरज नाही
ऑगस्ट 2018 मध्ये सिडकोने जाहीर केलेल्या गृहनिर्माण योजनेसाठी ज्या अर्जदारांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यांना पुन्हा नोंदणीची गरज नसून त्यांना आपल्या पूर्वीच्या युजर आयडी आणि पासवर्डचा वापर करता येणार आहे, अशी माहिती सिडकोचे पणन व्यवस्थापक लक्ष्मीकांत डावरे यांनी दिली आहे.

सिडकोच्या वतीने नुकत्याच काढण्यात आलेल्या 15 हजार घरांच्या लॉटरीमध्ये विविध प्रवर्गात एक हजार 100 घरे शिल्लक राहिली होती. त्यामध्ये आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांतील 73 तर अल्प उत्पन्न गटातील एक हजार 27 घरांचा समावेश आहे. ऑगस्ट 2018 मध्ये जाहीर झालेल्या लॉटरीप्रमाणे आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांसाठी पाच हजार तर अल्प उत्पन्न गटासाठी 25 हजार रुपये अनामत रक्कम यावेळीही ठेवण्यात आली आहे.

  • या गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज भरण्याची ऑनलाइन प्रक्रिया आज दुपारपासून सुरू झाली असून ती येत्या 31 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.
  • अर्जाची नोंदणी येत्या 30 जानेवारीपर्यंत करता येणार असून अनामत रक्कम येत्या 1 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत भरता येणार आहे.
  • अर्जदारांची यादी येत्या 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे. अंतिम यादी येत्या 11 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात येणार आहे.
  • या गृहनिर्माण योजनेची सोडत येत्या 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता बेलापूर येथील सिडको भवनमध्ये काढण्यात येणार आहे. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजता विजेत्या अर्जदारांची नावे संकेतस्थळावर जाहीर होणार आहेत.