नागरिकत्व विधेयक आज लोकसभेत, शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

4017

केंद्रीय गृह मंत्री अमित शहा हे येत्या सोमवारी नागरिकत्व (सुधारणा) विधेयक लोकसभेत सादर करणार आहेत. ईशान्येकडील राज्यांनी कडाडून विरोध केला असतानाही मोदी सरकार विधेयकावर ठाम राहिले आहे. त्यामुळे सभागृहात चर्चेसाठी विधेयक पुढे येताच त्यावर जोरदार हंगामा होण्याची शक्यता आहे. विधेयकावर शिवसेना काय भूमिका घेतेय याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानात होणाऱया छळवणुकीला त्रासून तेथील हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी आणि ख्रिश्चन हिंदुस्थानात आले. या बिगर मुस्लीम धार्मिक अल्पसंख्याकांना हिंदुस्थानचे नागरिकत्व सहज मिळवून देण्यासाठी मोदी सरकारने साठ वर्षांपूर्वीच्या विधेयकात दुरुस्ती करण्याचे पाऊल टाकले आहे. याविरोधात ईशान्येकडील राज्यांनी तीव्र निदर्शने केली आहेत. असे असतानाही केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या आठवडय़ात या विधेयकाला मंजुरी दिली.

त्यानंतर आता सोमवारी दुपारी गृह मंत्री अमित शहा यांच्याकडून हे विधेयक लोकसभेत सादर केले जाणार आहे. त्यानंतर चर्चा होऊन विधेयकाला मंजुरी मिळणार आहे. मोदी सरकारने या विधेयकाला जम्मू-कश्मीरमधील कलम-370 हटवण्याइतकेच महत्त्व दिले आहे. तथापि, ईशान्येकडील राज्यांचा विरोध आणि शिवसेनेच्या भूमिकेवर या विधेयकाचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून 31 डिसेंबर 2014 किंवा त्याआधी हिंदुस्थानात वास्तव्यास आलेल्या बिगर मुस्लीम धार्मिक अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्याचा प्रस्ताव आहे. या निर्वासितांविरोधात हिंदुस्थानात बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी याआधी दाखल करण्यात आलेले गुन्हे माफ केले जाणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या