
मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील सात रस्त्याजवळील व्हीआयपी रोडवर मुख्यमंत्री शिंदेंच्या गटातील दोन पदाधिकारी व समर्थकांमध्ये सशस्त्र हाणामारी झाली. यामध्ये तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
सुदर्शन बाळासाहेब साठे, प्रियदर्शन बाळासाहेब साठे व भगवान प्रकाश कदम अशी जखमींची नावे असून, त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिव्हिल पोलीस चौकीत हाणामारीच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे. शिंदे गटाचे अमोल शिंदे, सुदर्शन बाळासाहेब साठे या पदाधिकाऱयांसह 15 ते 20 जणांचा यात समावेश आहे.
सात रस्ता परिसरातील व्हीआयपी रोडवर अमोल शिंदे व त्यांच्या 15 ते 20 जणांच्या टोळीने सुदर्शन बाळासाहेब साठे व त्याचा भाऊ प्रियदर्शन बाळासाहेब साठे (रा. तीर्थरूप अपार्टमेंट रेल्वेलाईन) यांच्यावर हल्ला केला. लोखंडी सळई, काठीने घरासमोरच बेदम मारहाण केली. यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेत भगवान प्रकाश कदम (रा. उत्तर कसबा) याला अज्ञात कारणावरून सुदर्शन साठे, प्रियदर्शन साठे व त्याच्या दोन साथीदारांनी धारदार शस्त्राने वार करून जखमी केले. कदम याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत करण्यात आली आहे. अंतर्गत वादातून सदरची घटना घडल्याची चर्चा सुरू आहे.























































