खुल्या प्रवर्गासाठी मेडिकलच्या जागा वाढवून मिळणार, मुख्यमंत्र्यांची केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशी चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

खुल्या प्रवर्गासाठी वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या जागा वाढवून मिळणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात गुरुवारी  केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांची भेट घेतली. खुल्या प्रवर्गासाठी वैद्यकीयच्या जागा वाढवून द्या अशी आग्रही मागणी त्यांनी केली. त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन आरोग्य मंत्र्यांनी दिले. त्यामुळे खुल्या प्रवर्गासाठी वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या जागा वाढवून मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणासाठी मराठा आरक्षण लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केल्यानंतर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय प्रवेशाचा तिढा निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय प्रवेशासाठी विशेष आर्थिक मागास प्रवर्ग (एसईबीसी) आणि आर्थिक दुर्बल प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) या दोन्ही प्रवर्गांसाठी वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या जागा वाढवून द्याव्यात अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या 813 तर पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या 1740 जागा वाढवून द्या अशी विनंती त्यांनी केली.

मंत्रिमंडळ विस्ताराची लगबग
राज्यातील बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या या दिल्लीवारीत भाजपा अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. गृहमंत्रीपदी निवड झाल्याबाबत शाह यांचे अभिनंदन करत, मंत्रिमडळ विस्तारावर प्राथामिक चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर रात्री उशिराही त्या दोघांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी हा विस्तार होणार असून, राष्ट्रवादीतून भाजपात आलेले विजयिंसह मोहिते पाटील आणि विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिलेले राधाकृष्ण विखे पाटील यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची दाट शक्यता आहे.

प्रदेशाध्यक्ष पदावरही चर्चा होणार
भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे ‘एक व्यक्ती एक पद’ या न्यायानुसार दानवे यांना प्रदेशाध्यक्षपद सोडावे लागणार आहे. त्यामुळे दानवेंच्या जागी कोण याचा सोक्षमोक्ष 9 जून रोजी भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत लागेल, अशी माहितीही सूत्रांनी दिली. विधानसभा निवडणुकीपर्यंत दानवेंना मुदतवाढ द्यायची की नव्या चेहऱयाचा प्रदेशाध्यक्ष आणायचा, यावर या बैठकीत खल होणार आहे.

प्रकाश मेहतांची पाठराखण
गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्यावर लोकायुक्तांनीच भ्रष्टाचारप्रकरणी ताशेरे ओढल्यामुळे विरोधकांकडून मेहता यांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव येत असला तरी, मुख्यमंत्री फडणवीस यांनी मेहता यांची मात्र, पाठराखण केली आहे. मीडियाने गृहितकांच्या आधारे बातम्या करू नये, असा सल्ला देत मुख्यमंत्र्यांनी लोकायुक्तांचा रिपोर्ट आमच्याकडे आला असून तो ऍक्शन टेकन रिपोर्ट येत्या पावसाळी अधिवेशनात मांडू, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले.