
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची बहीण आणि YSRTP पक्षाच्या प्रमुख शर्मिला रेड्डी यांना मध्यरात्री अटक करण्यात आली. तेलंगणा पोलिसांनी त्यांना अटक करून अपोलो रुग्णालयात दाखल केले. टीआरएस सरकारच्या विरोधात त्यांनी बेमुदत उपोषण पुकारले आहे. तेलंगणाच्या टीआरएस सरकारने शर्मिला यांना प्रजाप्रस्थानम पदयात्रेला परवानगी दिली नाही. याच्या निषेधार्थ शर्मिला यांनी शुक्रवारी सकाळपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. शुक्रवारपासून त्यांनी अन्न आणि पाण्याचा त्याग केला. त्यामुळे त्यांची प्रकृती झपाट्याने खालावली.
शर्मिला यांचा रक्तदाब आणि शरीरातील ग्लुकोजची पातळी अत्यंत चिंताजनक असल्याचे अपोलो रुग्णालयातील डॉक्टरांचे म्हणणे आहे. शर्मिला यांचे उपोषण सुरु राहिले तर त्यांची किडनी निकामी होऊ शकते, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.
शर्मिला रेड्डी यांनी तेलंगणामध्ये केसीआर यांच्या पक्षाविरोधात आघाडी उघडली आहे. त्यांच्या सरकारविरोधातील मोर्चाला मान्यता मिळालेली नाही. याच्या निषेधार्थ शर्मिला यांनी पक्ष कार्यालयातच बेमुदत उपोषण सुरू केले आहे. जेव्हा त्यांच्या आई शर्मिला यांना पक्ष कार्यालयात भेटायला आल्या तेव्हा पोलिसांनी त्यांना अडवले.
त्यावर त्यांच्या आई विजयम्मा म्हणाल्या की, ही लोकशाही आहे का? याआधी कोणत्याही सरकारने आक्षेप घेतला नाही. चंद्राबाबू नायडू, वायएस राजशेखर रेड्डी, वायएस जगन, बंदी संजय कुमार, राहुल गांधी असोत यापूर्वी अनेक नेत्यांनी पदयात्रा केली आहे. वायएस शर्मिला यांची ही दुसरी पदयात्रा आहे. सरकारने संजय आणि राहुल गांधी यांना पदयात्रेला जाण्याची परवानगी दिली आहे, मग शर्मिला यांना परवानगी का दिली जात नाही? असा सवाल त्यांनी केला.



























































