
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’, ‘मी जबाबदार’ या योजनेप्रमाणे ‘कोरोनामुक्त गाव’ योजनेकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष पेंद्रित करावे. सर्वप्रथम ‘माझे घर कोरोनामुक्त’ यावर भर द्या. कोरोनाचे संकट मुळापासून उपटून फेकायचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.
कुडाळ एमआयडीसी येथे अवघ्या 15 दिवसांत बसविण्यात आलेल्या युनायटेड एअर गॅस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनिर्मित 6 के.एल. क्षमतेच्या लिक्विड ऑक्सिजन रिफिल प्लांटचे ऑनलाइन लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, दीपक केसरकर, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे आदी उपस्थित होते.
भविष्यातील पुढची लाट आलीच तर त्यासाठी ऑक्सिजनची क्षमता वाढवणे, आरोग्य सुविधा वाढवणे व चाचण्यांची क्षमता वाढवण्याचे नियोजन आतापासूनच करा.
– उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
कोकणच्या किनाऱयावर नेहमीच नैसर्गिक संकटे येत असतात. पाऊस, कधी अतिवृष्टी तर कधी चक्रीवादळ अशा संकटांबरोबरच कोविडचाही मुकाबला करत आहात. केवळ मुकाबला न करता एक एक पाऊल पुढे टाकत आहात. तोही अगदी आत्मविश्वासाने. त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून कौतुक करतो. पुढच्या संकटाची गंभीरता कमी करण्यासाठी तजवीज करणे आणि त्याचबरोबर संकट येणारच नाही त्यासाठीही नियोजन करणे हे महत्त्वाचे आहे. सध्याच्या प्लांटची क्षमता 20 के.एल. पर्यंत वाढवावी. त्याचबरोबर मागील अनुभव पाहता जिह्याला भासलेल्या ऑक्सिजनची आवश्यकता पाहून तशी तरतूद करून ठेवा.
अद्ययावत रुग्णवाहिका
जिल्ह्यामध्ये 22 अद्ययावत रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. मॉडय़ुलर ओटीची संकल्पना घेऊन सिंधुदुर्ग, सावंतवाडी, कणकवली, कुडाळ या चार ठिकाणी त्याची उभारणी करण्यात येणार आहेत. ऑक्सिजनमध्ये जिल्ह्याला स्वयंपूर्ण करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी दोन ऑक्सिजन प्लांट उभे केले आहेत, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली






























































