दिवाळीनंतर शाळा सुरू करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर नववी ते बारावीचे वर्ग सुरू करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते.

जागतिक परिस्थिती पाहता कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्याता नाकारता येत नाही. त्यामुळे दिवाळीनंतरचे पुढचे काही दिवस अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. या बैठकीला शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू, अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा उपस्थित होते. ज्या शाळांमध्ये क्वारंटाईन सेंटर्स तयार करण्यात आली होती ती सेंटर्स बंद करता येणार नाहीत. अशा ठिकाणच्या शाळा पर्यायी जागेत सुरू करता येतील यावर स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले, तर शाळा सुरू करताना टप्प्याटप्प्याने शाळा सुरू कराव्या; तसेच शाळा व्यवस्थित सुरू रहाव्या यासाठी स्थानिक प्रशासनाला योग्य त्या सूचना देण्याची विनंती राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांना केली.

शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी 17 ते 22 नोव्हेंबरदरम्यान स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून करून घेतली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिली. तसेच 23 नोव्हेंबरपासून शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे थर्मल चेकिंग करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गाफील राहू नका

कोरोना वाढीचा मृत्युदर कमी होताना दिसत असला तरी गाफील राहू नका. पाश्चिमात्य देशात आलेल्या दुसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर पुढील काही महिने नागरिकांनी खबरदारी घ्यावी. मास्क न वापरणाऱयांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱयांसोबत व सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत दोन स्वतंत्र बैठका घेतल्या. या दोन्ही बैठकांमध्ये त्यांनी कोरोनाविषयक काळजी घेण्याचे आवाहन केले.

सध्या फिल्ड हॉस्पिटल किंवा कोविड केअर केंद्राच्या उभारण्यात आलेल्या सुविधा काढून टाकू नका. दुसऱया लाटेची तयारी करा, कर्मचारी व सुविधा यांची तयारी करून ठेवा, लस डिसेंबर अखेर किंवा एप्रिलमध्ये येईल असा अंदाज आहे असे ते म्हणाले.

पाच हजार खाटांचे रुग्णालय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सांसर्गिक आजारांवरील उपचाराचे 5 हजार खाटांचे रुग्णालय करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

काळजी घेणे आवश्यक

शाळांचे सॅनिटायजेशन, शिक्षकांची कोरोना तपासणी यासारख्या सर्व बाबींची काळजी घेणे सध्या आवश्यक असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच पालकांनीही खबरदारी घेण्याची गरज असून घरातील व्यक्ती किंवा मुले आजारी असतील तर अशा पाल्यांना शाळेत पाठवू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
n एक दिवसआड वर्ग भरेल.
n विद्यार्थ्यांनी घरून जेवून यावे. शाळेत येताना पाण्याची बाटली सोबत आणावी.
n एका बाकावर एकच विद्यार्थी बसेल.
n शाळा चार तास भरेल. त्यात केवळ विज्ञान, गणित आणि इंग्रजी असे विषय शिकवले जातील.

मंदिरांबाबत निर्णय दिवाळीनंतर

प्रार्थनास्थळे उघडण्याच्या बाबतीतही दिवाळीनंतर निर्णय घेऊ. मंदिरांमध्ये ज्येष्ठ नागरिक नियमितपणे जातात. हा विषाणू ज्येष्ठ आणि सहव्याधी रुग्णांना अधिक धोकादायक असल्याने याबाबत अधिक काळजी घेऊन निर्णय घ्यावा लागतो असे मुख्यमंत्री म्हणाले.