मुलाचं लग्न आणि लॉकडाउनसंदर्भात व्हायरल झालेल्या मेसेजवर मुख्यमंत्री रुपाणींचं स्पष्टीकरण

देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव वेगानं होत आहे. या नव्या लाटेमुळे विविध राज्यांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून कठोर निर्बंध लादले जात आहेत. काही ठिकाणी लॉकडाउन लागू करण्यात येत आहे तर काही भागात नाइट कर्फ्यू लावला जात आहे. यादरम्यान गुजरातमध्ये एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना लक्ष्य करण्यात आलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये म्हटलं आहे की, मुख्यमंत्र्यांच्या मुलाचं लग्न आहे त्यामुळे गुजरातमध्ये लॉकडाउन करण्यात येणार नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या ट्विटनंतर आपला मुलगा ऋषभच्या लग्नासंदर्भातील या मेसेजवरून मुख्यमंत्री रुपाणी यांनी ट्विट करून सफाई दिली आहे. मुख्यमंत्री रुपाणी यांनी त्यांच्या मुलाचं लग्न मे मध्ये असल्याचे वृत्त निराधार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

ते म्हणतात की, असं कठलंही आयोजन करण्यात आलेलं नाही आणि असं कोणतं आयोजन सध्यातरी करण्यात येत नाहीय. सोशल मीडियावर व्हायरल झालेलं वृत्त हे निराधार आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे की, माझं आणि माझ्या सरकारचा एकच उद्देश आहे ते म्हणजे गुजरातमध्ये कोरोना संक्रमण थांबवणं. दरम्यान, गुजरात उच्च न्यायालयाने सरकारला वीकेंड लॉकडाउन किंवा 3 ते 4 दिवसांचा कर्फ्यू लागू करण्याचे निर्देश दिले होते.

न्यायालयाच्या निर्देशानंतर एक उच्च स्तरीय बैठक घेण्यात आली होती. या बैठकीनंतरच मुख्यमंत्र्यांच्या संदर्भातील हा मेसेज व्हायरल झाला होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मेसेजमध्ये लिहिण्यात आले होते की, ‘माझ्या मुलाचं लग्न आहे, लॉकडाउन लागणार नाही.’ दुसरीकडे लॉकडाऊनच्या भीतीने मुख्य बाजारांमध्ये गर्दी झाली होती आणि कोविडच्या नियमांचं पालन देखील केलं जात नव्हतं.

आपली प्रतिक्रिया द्या