
सामना ऑनलाईन । मुंबई
गेले काही दिवस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा निवडणुकीत दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवणार असल्याची अफवा पसरली होती. यामध्ये ते नागपूरसह मुंबईतील एका मतदारसंघातूनही निवडणूक लढवतील असे अफवा पसरवणाऱ्यांचे म्हणणे होते. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस फक्त नागपूरमधूनच निवडणूक लढणार असल्याचे भाजपच्या मंत्र्यांने सांगितले आहे.
देवेंद्र फडणवीस हे मुंबईतील मलबार हिल किंवा मुलुंडमधून निवडणूक लढवणार अशी अफवा होती. त्यातील मलबार हिलचा पर्याय आघाडीवर होता. हा भाग भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना या जागेवरून उतरवण्यात येईल अशी चर्चा होती. यावर पक्षातील वरिष्ठांचे एकमत झाल्यास फडणवीस नागपूर आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी निवडणूक लढवणार अशी जोरदार चर्चा होती. मात्र, मुंबई मिरर या वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत भाजपच्या एका मंत्र्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की मुख्यमंत्री फक्त नागपूरमधूनच निवडणूक लढवणार आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस नागपूरच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघातून निवडून आले आहेत. 1990 मध्ये त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. ते नागपूर महापालिकेवर रामनगर वार्डमधून निवडून गेले होते. त्यानंतर 28 व्या वर्षी ते महापौर बनले. नागपूरमधील सर्वात तरुण महापौर आणि देशातील ते दुसरे तरुण महपौर ठरले होते. 1999 पासून ते आमदार आहेत. भाजपने लोकसभेतील घवघवीत यशानंतर आता विधानसभेतही मोठे यश मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या स्वच्छ प्रतिमेचा पक्षाला फायदा व्हावा आणि फक्त नागपूरचा नेता ही त्यांची ओळख बनू नये, यासाठी मुख्यमंत्री मुंबईतूनही निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता ग्रामीण भागासह शहरी भागातही वाढली आहे.



























































