गोलपोस्टच्या पलीकडचे…नेयमारच्या निवृत्तीची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रशियातही ब्राझीलचा संघ उपांत्यपूर्व फेरीतच हरला होता आणि आताही त्यांना त्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. या धक्क्यामुळे ब्राझीलचा सुपरस्टार खेळाडू नेयमारही कोलमडला आहे. पराभवानंतर नेयमार म्हणाला, मी पुन्हा राष्ट्रीय संघात दिसेन याची आता खात्री देता येत नाही. मी राष्ट्रीय संघाचे दरवाजे बंद करीत नाहीय, पण मी पुनरागमन करेन याची शंभर टक्के शाश्वतीही देऊ शकत नाही. त्याच्या या प्रतिक्रियेमुळे नेयमार आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त होणार असल्याचे अंदाज वर्तविले जात आहेत. ब्राझीलच्या पराभवानंतर प्रशिक्षक टेटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ब्राझीलचा पराभव फारच दुःखद आणि त्रासदायक आहे, पण मी माझे पद अत्यंत शांतीपूर्वक सोडत असल्याचे ते म्हणाले.

थराराने घेतला पत्रकाराचा जीव

अर्जेंटिना-नेदरलॅण्ड्स यांच्यातील थरारक सामना जीवघेणा ठरला. 48 वर्षीय अमेरिकन पत्रकार ग्रॅण्ट वहलला या सामन्याचा आनंद लुटत असताना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. नंतर त्यांचे निधन झाल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र त्याचे निधन नक्की कशाने झाले याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. ग्रॅण्टने या थरारक सामन्यादरम्यान आता हे काय झाले, असे ट्विटही केले होते. काही दिवसांपूर्वी ग्रॅण्टने समलैंगिक संबंधांना पाठिंबा दर्शविणारे टी शर्ट परिधान केले होते. कतारमध्ये समलैंगिक संबंधांबाबत कठोर नियम असल्यामुळे ग्रॅण्टला पाठिंबा दिल्याप्रकरणी ताब्यातही घेण्यात आले होते. त्यानंतर त्याला कतार पोलिसांनी दंड ठोठावून मुक्तही केले होते. ग्रॅण्टने डेव्हिड बेकहम अमेरिकेत प्रसिद्ध झाल्यावर त्याच्यावर एक पुस्तकही लिहिले होते.