
सामना ऑनलाईन। बीजिंग
चीनमध्ये एका खाणीत झालेल्या भूस्खलनात 21 मजुरांचा मृत्यू झाला असून 66 जणांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले आहे. शांसी प्रांतातील लिजियागौ येथील बैजी मायनिंग या कोळशाच्या खाणीत ही दुर्घटना घडली आहे. या खाणीत एकूण 87 मजूर काम करत होते. शिन्हुआ या वृतसंस्थेने याबद्दल वृत्त दिले आहे.
चीन जगातील सर्वात मोठा कोळसा उत्पादक देश असून खाणीत दुर्घटना होण्याचे प्रकार येथे सतत घडत असतात. येथे खाणीत काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षेसाठी कंपन्या काहीही उपाययोजना करत नाहीत. गेल्या महिन्यात शानदोंग येथे खाणीच्या प्रवेशद्वारावरच दरड कोसळल्याने आतमध्ये अडकून 21 मजूर मृत्युमुखी पडले होते. चीनमध्ये 2017 साली खाणीत 375 मजुरांचा मृत्यू झाला होता. तर 2016 मध्ये हा आकडा 28.7 टक्क्यांनी कमी होता.
























































