
कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांच्यासह कार्यकर्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांची पोलिसांच्या ताब्यातून सुटका झाली आहे. सुटकेनंतर सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी पत्रकार परिषद घेत दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. हजारो लोकांना शांततेत आंदोलन करायचे होते, मात्र त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
आशुतोष रांका यांनी आरोप केला की, “काल आम्हाला विमानातूनच उचलण्यात आले. ज्या आणीबाणीबद्दल आम्ही ऐकले होते, त्या आणीबाणीपेक्षाही वेगळा अनुभव या 72 तासांत आला. आणीबाणीच्या काळातही रेल्वे बंद करण्यात आली नव्हती; मात्र आता रेल्वे बंद करण्यात आली आहे.”
निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवरही रांका यांनी प्रश्न उपस्थित केले. निवडणूक आयोग निष्पक्षपणे काम करत नसून भाजपसाठी काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. विमानातूनच ताब्यात घेण्यात आल्याचे सांगत त्यांनी दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर टीका केली.
अभिजीत दिपके यांच्या आजीचे काल निधन झाले. ही माहिती दिपके यांना देण्यात आली, त्यावेळीही दिल्ली पोलिसांनी अमानवी वर्तन केल्याचा आरोप रांका यांनी केला. या प्रसंगी पोलीस कॅमेरा आणि माइक घेऊन आल्याचेही त्यांनी सांगितले.
सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या म्हणण्यानुसार, अभिजीत दिपके यांना त्यांच्या भावाशी बोलू देण्यात आले नाही. आजीच्या निधनामुळे दुःखात असलेल्या दिपके यांना कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात अडथळे आल्याचा आरोप त्यांनी केला.
आजीच्या अंत्यसंस्कारासाठी अभिजीत दिपके रवाना
अभिजीत दिपके आज आपल्या आजीच्या अंत्यसंस्कारासाठी गेले आहेत. त्यांच्या वैयक्तिक दुःखाचा राजकीय कार्यक्रम किंवा प्रसिद्धीचा विषय बनवण्याची त्यांची इच्छा नव्हती, असे रांका यांनी स्पष्ट केले. मात्र, या आंदोलनाची लढाई अद्याप संपलेली नसून ती आता सुरू झाली आहे, असा इशाराही त्यांनी दिला.



























































