
सामना प्रतिनिधी । येलदरी वसाहत
येलदरी धरणाखालील पूर्णा नदीच्या पात्रातून जिंतूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेवरील विद्युत रोहित्राची वीज तोडून चोरट्यानी २०० के.व्ही. रोहित्रातील कॉईलसह ऑइल चोरून नेले. ही घटना ४ मार्च रोजी रात्री उशीरा घडली. विशेष म्हणजे चोरट्यांनी एक्सप्रेस फिडर वरील वीजपुरवठा बंद करून ही धाडसी चोरी केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
चोरट्यांनी येथील विदुयत रोहित्राचे वरचे झाकण उघडून त्यातील मुख्य कॉईल व ऑइल काढून घेतले. जिंतूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी २४ तास येथील विद्युत मोटार चालू ठेवावी लागते. त्यामुळे येथे रात्रीच्या वेळी दोन ऑपरेटर कर्तव्यावर असतात. ते असतांना देखील चोरट्यांनी येथील विद्युत रोहित्र बंद करून त्यातील १ लाख रुपयांच्या सामानाची चोरी केली. या घटनेची माहिती मिळताच जिंतूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष कपिल फारुकी, नगरअभियंता व्ही.ए. आडसकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.एल. शेख, बिट जमादार पांडुरंग तुपसुंदर, बडे, पी.आर. तिथे आदी घटनास्थळी दाखल झाले, पोलिसांनी केलेल्या पाहणीत चोरटे सेनगाव रोडच्या दिशेने गेले असावेत असा अंदाज आहे. ४ मार्च रोजी रात्रीपासून जिंतूर शहराचा पाणीपुरवठा बंद आहे. आज मंगळवारी रात्री उशिरापर्यंत पर्यंत तो सुरळीत चालू होईल, अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली. या वर्षी पाणी टंचाईमुळे जिंतूर तालुक्यात तीव्र दुष्काळ असून सर्व व्यवहार मंदावले आहेत. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम नाही. परिणामी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.




























































