थंडीचा कडाका वाढला; पारा 5 अंशाखाली गेल्याने नगरमध्ये हुडहुडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
cold-wave

सामना प्रतिनिधी । नगर

थंडीचा कडाका सर्वत्र वाढत आहे. सलग चार दिवस पारा 3 अंशांनी खाली उतरल्याने रविवारी नगरमध्ये राज्यातील निच्चांकी तापमानाची नोंद झाली. रविवारी शहरातील पारा 4.5 अंशापर्यंत खाली गेला असल्याने शहरात नागरिकांना हुडहुडी भरली आहे. पारा पाच अंशाच्या खाली गेल्याने नगरकर गारठले आहेत.

येत्या 24 तासात राज्यात हुडहुडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शहरात उन्हाचा जोर कमी झाला असून शहरात उबदार कपड्यांची मागणी वाढली आहे. राज्यात नागपूरमध्ये सर्वात कमी 4 अशांपर्यंत पारा घसरला होता. थंडीचा कडाका दोन-तीन दिवस कायम राहणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मराठावाडा आणि विदर्भाच्या काही भागात थंडीची लाट आली असून, येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्ष स्वागतासाठी 31 डिसेंबरची रात्रदेखील यंदा कुडकुडत काढावी लागणार आहे. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये रब्बी पिकांना थंडी पोषक ठरणार आहे. बटाटा, कांदा आणि फळवर्गीय पिकांना या थंडीचा फायदा होणार आहे. याशिवाय ज्वारी, गहू, हरभरा या पिकांच्या वाढीसाठी हवामान पोषक आहे. सध्या रब्बी पिके वाढीच्या स्थितीत असून, काही ठिकाणी गहू आणि हरभर्‍याच्या पेरण्या सुरू आहेत.