
सामना प्रतिनिधी । मुंबई
‘युनेस्को’ने जागतिक वारसा यादीत समाविष्ट केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या व्हिक्टोरियन गॉथिक शैलीच्या हेरिटेज इमारतीच्या तळमजल्यावर अखेर रेल्वेचे वस्तुसंग्रहालय साकारणार आहे. या संग्रहालयात देशातील नव्हे तर संपूर्ण आशियातील पहिल्या रेल्वेचा 1853 पासूनचा इतिहास अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ‘व्हर्च्युअल रियालिटी शो’च्या माध्यमातून दाखविण्यात येणार आहे.
सीएसएमटीतील तळमजल्यावर वाहतूक संग्रहालय करण्याची योजना रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मांडली होती. सीआरएमएस युनियनने त्यास विरोध केला होता. रेल्वेमंत्र्यांच्या योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राधान्यक्रम ठरवा व हे काम पुढे ढकला असे म्हटले होते. मात्र आता येथील जनसंपर्क कार्यालय अन्यत्र हलविण्यात येणार असून या हेरिटेज इमारतीच्या तळमजल्यावर दक्षिण बाजूच्या जागेत रेल्वेच्या दिल्ली संग्रहालयाच्या धर्तीचे रेल्वेचे संग्रहालय आकारास येत आहे.
असा असणार व्हर्च्युअल रियालिटी शो…
या इमारतीच्या संग्रहालयात व्हर्च्युअल रियालिटीवर आधारित 16 मे 1853 चा बोरीबंदर ते ठाणे या पहिल्या रेल्वेचा प्रवास दाखवला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आपण रेल्वेत बसल्याचा आभास होणार आहे. नुकतेच मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांसमोर या योजनेचे सादरीकरण झाले आहे. ‘हेरिटेज गॅलरी’ येथे या इमारतीच्या डिझाइनसह ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वे कंपनीचे महत्त्वाचे करार, दुर्मिळ छायाचित्रे, रेल्वेची बोधचिन्ह वजन काटा, आदी पुरातन वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.
आर्किटेक्ट स्टीव्हन यांचे किचन गार्डन पाहता येणार
130 वर्षे जुन्या असलेल्या या इमारतीचे डिझाइन ब्रिटिश स्थापत्य रचनाकार एफ. डब्ल्यू. स्टीव्हन यांनी केले. स्टीव्हन जेथे बसून न्याहरी करायचे ते किचन गार्डन इमारतीच्या मागच्या बाजूला होते. ते पुन्हा उभारण्यात येणार आहे. लांब पल्ल्याच्या फलाटाजवळही हेरिटेज गल्ली आकारास येत असून येथे नुकतेच वाफेचे इंजिन आणण्यात आले होते. तेथे आता डीसी लोको, आणखी एक स्टीम क्रेन आणि सलून आणण्यात येणार आहे.


























































