अनेक कंपन्यांकडून यंदाही दिवाळी गिफ्ट नाही, वाचा काय आहे कारण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दिवाळी आणि कंपन्यांकडून मिळणारी गिफ्ट हे समीकरण अनेक खासगी कंपन्यांकडून मोडण्यात आलं आहे. वाढती महागाई आणि जीएसटीमध्ये या गिफ्टबाबत नसलेली स्पष्टता, तसेच करात मिळणारी सूट बंद झाल्याने अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट दिलेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.

दरवर्षी दिवाळी आली की कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना भेटवस्तू, मिठाई देतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना देखील यंदा दिवाळीत काय गिफ्ट मिळणार याची उत्सुकता लागून राहिलेली असते. काही कंपन्यांनी दिवाळीतील ही परंपरा कायम ठेवला असला तरी आपल्या गिफ्टवरील खर्चात प्रचंड कपात केली आहे. अनेक खासगी कंपन्यांनी तर दिवाळी गिफ्ट काही वाच्यता न करताच बंद केल्याची माहिती मिळते आहे. दिवाळीनिमित्त देण्यात येणाऱ्या भेटवस्तूंमुळे याआधी कंपन्यांना करातून सूट मिळत होती. त्यामुळे कंपन्या कर्मचाऱ्यांना देखील सढळ हाताने भेटवस्तू देत होत्या.

दिवाळी निमित्त कर्मचारी, ग्राहक, डीलर, एजंट यांना दिवाळीच्या काळात गिफ्ट दिले जातात. त्यातून व्यवसाय वृद्धी हा महत्वाचा उद्देश असतो. त्यामुळे सेक्शन-16 नुसार ही गिफ्टचा खर्च हा व्यवसाय वृद्धीसाठी केला जाणाऱ्या खर्चात धरला जावा, अशी मागणी सरकारकडे केली जात आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेले नाही. त्यामुळे अनेक खासगी कंपन्यांनी दिवाळी गिफ्ट थेट बंद केले आहे. मागील वर्षी देखील नोटाबंदी, जीएसटी, वाढती महागाई यामुळे गिफ्टसाठी आखडता हात घेतला होता.

मिठाई, चॉकलेट, घरगुती वापरातील वस्तू महागल्याने कंपन्यांना मोठी रक्कम मोजावी लागत आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी भेटकार्डावर कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर अनेकांनी गिफ्ट खर्चात कपात केली आहे. जीएसटी लागू होण्यापूर्वी अशा गिफ्टसाठी करातून सूट मिळत होती, मात्र जीएसटीच्या सेक्शन 17(5) मध्ये काही सेवा आणि खर्चांवरील कर सूट बंद करण्यात आली आहे, ज्यामध्ये गिफ्टचाही समावेश आहे. त्यामुळे खासगी कंपन्यांमधील अनेक कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा सूनीसूनीच राहिली आहे.