
सामना ऑनलाईन । मुंबई
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या शासकीय बंगल्याचा उपयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्याच्या पत्रकार परिषदेसाठी केल्याच्या मुद्दय़ावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात आचारसंहिता भंग झाल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या उमेदवार निवडीच्या बैठका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या ‘बी फोर’ या शासकीय बंगल्यावर आयोजित केल्या जात होत्या. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रकाशन सोहळा धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर आयोजित करण्यात आला होता. वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा नवी दिल्लीत प्रकाशित करण्यात आला होता, मात्र त्याचवेळेस मुंबईत धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरही पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित केला होता.
काँग्रेसमुळे राष्ट्रवादी अडचणीत
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धर्तीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या ए-6 या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजित करण्याची काँग्रेसची योजना होती, पण विखे-पाटील यांच्या बंगल्यावर पत्रकार परिषद आयोजित करण्यासाठी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांना परवानगी नाकारण्यात आली. त्यावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसला परवानगी कशी दिली असा मुद्दा काँग्रेसने उपस्थित केला. त्यानंतर निवडणूक आयोगाने धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पत्रकार परिषदेची व्हिडीओ क्लिप तपासून पाहिली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात आचारसंहिता भंग झाल्याचा गुन्हा नोंदवून राष्ट्रवादीला नोटीस बजावण्यात आली आहे.


























































