
नवनियुक्त राज्यपाल तसेच मुंबई विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी विद्यापीठांना परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करण्याच्या सूचना दिल्या. या सूचनांचे पालन करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने नुकत्याच जाहीर केलेल्या बीकॉम अंतिम वर्षाच्या सत्र-6 च्या निकालात प्रचंड गडबड गोंधळ घातला आहे. परीक्षकांनी तपासलेल्या काही उत्तरपत्रिकांचे नियामकांकडून मॉडरेशनच झाले नसल्याचा संशय व्यक्त होत आहे. तसेच निकाल लवकर लावण्यासाठी सुट्टीवर असलेल्या अथवा बाहेरगावी गेलेल्या प्राध्यापकांना त्यांच्या लॅपटॉपवर उत्तरपत्रिका तपासणीसाठी उपलब्ध करून दिल्याचे समोर आले आहे. यंदा बीकॉम अंतिम वर्षाची परीक्षा दिलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी केवळ 38 टक्के विद्यार्थ्यांनाच पदवी मिळाली असून 60 हजार 285 विद्यार्थ्यांपैकी केवळ 15 हजार 346 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे या निकालाभोवती संशयाचे ढग फिरू लागले आहेत.
बीकॉमच्या परीक्षांचे निकाल जाहीर केले की, मुंबई विद्यापीठाच्या निकालांचे जवळपास 75 टक्के काम पूर्ण होते. त्यामुळे विद्यापीठाने या निकालासाठी प्रचंड धावपळ केली, असा आरोप ‘मुक्ता’ संघटनेचे जनरल सेव्रेटरी प्रा. सुभाष आठवले यांनी केला आहे. बीकॉमची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने पार पडली तर उत्तरपत्रिकांची तपासणी ओएसएम पद्धतीने ऑनलाइन केली जाते. कॉलेजपासून दूर असलेल्या प्राध्यापकांनी त्यांच्यापासून जवळ असलेल्या मुंबई विद्यापीठांतर्गत महाविद्यालयातील कॅप सेंटरमध्ये जाऊन उत्तरपत्रिकांची तपासणी करणे अपेक्षित होते, पण या प्राध्यापकांनी तसे केले नसल्यास त्यांच्या लॅपटॉपमध्ये नियमबाह्यपणे उत्तरपत्रिका तपासणीसाठी उपलब्ध करून दिल्याचा संशयही प्रा. आठवले यांनी व्यक्त केला आहे.
बीकॉमचा निकाल जाहीर करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने अनेक नियमांचे उल्लंघन केले आहे. या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. हे विद्यार्थी आता पुनर्मूल्यांकन, उत्तरपत्रिकेची पह्टो कॉपी आणि नंतर फेरपरीक्षेसाठी अर्ज करतील. यातून विद्यापीठाला मोठा आर्थिक फायदा होणार आहे. प्रत्येक प्राध्यापकांनी किती उत्तरपत्रिका तपासल्या त्यावेळी त्यांचे लोकेशन काय होते, एक उत्तरपत्रिका तपासण्यासाठी किती वेळ लागला? ही माहिती स्टॅटिक आयडीद्वारे बाहेर येणे गरजेचे आहे.
– प्रा. सुभाष आठवले, जनरल सेक्रेटरी, मुक्ता
या उत्तरपत्रिकांचे होते मॉडरेटिंग
समजा, एकूण 100 गुणांपैकी 30 ते 40 गुण मिळालेल्या तसेच 80 च्या वर गुण असलेल्या सर्व उत्तरपत्रिकांचे 100 टक्के मॉडरेटिंग होते.
तसेच 41 ते 79 गुण असलेल्या उत्तरपत्रिकांचे 15 टक्के मॉडरेटिंग करण्याचा नियम आहे.
बोर्ड ऑफ स्टडीज अस्तित्वातच नाही
कोणत्याही परीक्षा घेण्यापूर्वी बोर्ड ऑफ स्टडीजची स्थापना करणे आवश्यक आहे. पेपर सेट कुणी करायचे, ते तपासायचे कोणी, याची यादी तयार करण्याचे काम बोर्ड ऑफ स्टडीजमार्फत केले जाते. त्यानंतर ही यादी परीक्षा व मूल्यमापन विभागाकडे पाठविली जाते. त्यानंतर कामाच्या नेमणुका केल्या जातात. मात्र बीकॉमच्या परीक्षेसाठी अशा कोणत्याही बोर्ड ऑफ स्टडीजची स्थापना केली नसल्याचा आरोप ‘मुक्ता’ संघटनेने केला आहे.





























































