
काँग्रेसमुळे मुंबईतला कोरोना देशभरात पोहोचला या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. काँग्रेसकडूनही या वक्तव्यावर सडेतोड उत्तर देण्यात आले असून रेल्वेचे नियंत्रण केंद्र सरकारकडे होते. त्यांनीच रेल्वे सुरू केली होती, मग काँग्रेसवर खापर कसले फोडताय, असा बिनतोड सवाल करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी हे भाजपचे प्रचारक असून निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच त्यांनी हे विधान केले आहे, असा जोरदार टोला काँग्रेसकडून लगावण्यात आला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना जोरदार निशाणा साधला. कोरोना लॉकडाऊनमध्ये काँग्रेसने माणुसकीचे नाते जपले. लोकांकडे पैसे नव्हते तेव्हा त्यांना मदत केली. यासाठी शाबासकी दिली पाहिजे. पण इथे उलटाच प्रकार सुरू आहे. उत्तर प्रदेशात गंगेत प्रेतांचा खच पडला, तिकडे कोरोना नियंत्रण करता आले नाही. हे पाप झाकण्याकरता काँग्रेसवर आरोप केले जात आहेत, अशी टीका पटोले यांनी केली.
महाराष्ट्र सरकारने केलेल्या मदतीचा अभिमान
कोरोना काळात मजूर बांधवांना महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आणि काँग्रेसने केलेल्या मदतीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. केंद्र सरकारने आपले अपयश लपविण्यासाठी पातळी सोडून राजकारण करू नये, असा इशारा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला.
निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून विधान
कोरोना व्यवस्थापनातील आपले अपयश लपवण्यासाठी केंद्र सरकार काँग्रेसवर चुकीचे आरोप करत आहे. काही राज्यातील विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून असे विधान केले जात आहे, अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय विमाने बंद करण्याकडे दुर्लक्ष
ज्या वेळी कोरोना संकटाबाबत राहुल गांधी बोलत होते केंद्राने त्याकडे दुर्लक्ष केले. महारष्ट्र सरकार आंतरराष्ट्रीय विमाने बंद करण्याची विनंती करत होते तेव्हादेखील दुर्लक्ष केले. उलट केंद्र सरकारमुळे महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात कोरोना वाढला, असा आरोप भाई जगताप यांनी केला.
मोदींनी देशाला वाऱयावर सोडले
कोरोनाकाळात मोदींनी देशाला वाऱयावर सोडले. लोकांना अन्न आणि गावी जाण्यासाठी वाहने नव्हती तेव्हा मोदींना काय वाटत होते, असा सवाल गोव्यात निवडणूक प्रचारात असलेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केला.
पंतप्रधानांचे वक्तव्य साफ खोटे
पंतप्रधानांचे वक्तव्य साफ खोटे आहे. ज्यांनी कोरोनाकाळात दुःख सोसले, ज्यांनी आप्तस्वकीय गमावले, त्यांच्या प्रति पंतप्रधान संवेदनशील असतील अशी देशाची अपेक्षा आहे. मात्र लोकांच्या दुःखावरच राजकारण करणे पंतप्रधानांना शोभत नाही, अशी टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली.



























































