आलोक वर्मा प्रकरणाचा दक्षता आयोगाचा अहवाल जाहीर करा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

सीबीआयच्या संचालकपदावरून अलीकडेच हटवले गेलेले आलोक वर्मा यांच्याबाबतचा केंद्रीय दक्षता समितीचा अहवाल सरकारने जाहीर करावा, अशी जोरदार मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. तसेच सीबीआय संचालकांच्या निवडीसाठी असलेल्या उच्चाधिकार समितीची वर्मा यांना हटविण्यासंदर्भात नुकतीच बैठक झाली. या बैठकीचा अहवालही सरकारने जाहीर करावा, अशी मागणीही खरगे यांनी मोदी यांच्याकडे केली आहे.

सीबीआयच्या नव्या संचालकांच्या नियुक्तीसाठी त्वरित निवड समितीची बैठक बोलावण्यात यावी, असेही खरगे यांनी मोदींकडे मागणी करताना म्हटले आहे. पंतप्रधानांचा समावेश असलेल्या उच्चाधिकार समितीने वर्मा यांची सीबीआय संचालकपदावरून हकालपट्टी केली. या हकालपट्टीस खरगे यांनी उच्चाधिकार समितीत प्रखर विरोध केला. वर्मा यांना त्यांची बाजू मांडू द्यावी. मगच काय तो त्यांच्याबाबत निर्णय घ्यावा, अशी भूमिका या समितीच्या बैठकीत खरगे यांनी मांडली.

केंद्रीय दक्षता आयोगाने निवृत्त न्यायमूर्ती ए. के. पटनायक यांच्यामार्फत आलोक वर्मा यांची चौकशी झाली. या चौकशीत वर्मा यांनी भ्रष्टाचार केल्याचे आढळून आलेले नाही. या पार्श्वभूमीवर दक्षता आयोगाचा अहवाल जनतेसमोर ठेवा. जनतेलाच काय तो निष्कर्ष काढू द्या, असे खरगे यांनी म्हटले आहे.