उपजिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसणाऱ्या सोमय्यावर गुन्हा दाखल करा ः काँग्रेसची मागणी

भाजप नेते किरीट सोमय्या कोणत्या अधिकारात वर्धा उप जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीत जाऊन बसले? असा सवाल कॉँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. या बेकायदेशीर कृत्यासाठी सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली आहे.

केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आल्यापासून भाजप पदाधिकाऱ्यांकडून प्रशासनातील अधिकाऱ्यांवर जोरजबरदस्ती केली जात आहे. भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी वर्धा येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयाचा ताबा घेऊन खुर्चीत बसून कसा अधिकार गाजवला. याबाबतचे वृत्त मंगळवारी दै. ‘सामना’ने छायाचित्रासहीत प्रसिद्ध केले. कॉँग्रेस प्रदेश अध्यक्ष सपकाळ यांनी हे वृत्त आपल्या एक्सवर पोस्ट करत हा बिनपगारी फुल अधिकारी कुणी नेमला, असा सवाल सरकारला केला आहे.

सोमय्या कुठल्या अधिकारात वर्धा उप जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाचा ताबा घेऊन, खुर्चीत बसून अधिकार गाजवत आहेत? सरकारने याला विशेष अधिकार दिले आहेत का? नसतील तर हे सत्ताबाह्य केंद्र उखडून टाका. या बेकायदेशीर कृत्यांसाठी गुन्हा दाखल करा, अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे.