
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारात झालेल्या 3600 कोटींच्या घोटाळाप्रकरणी अटकेत असलेला दलाल क्रिश्चियन मिशेल याने धक्कादायक खुलासा केला आहे. या घोटाळ्याच्या कागदपत्रांमध्ये उल्लेख असलेला AP म्हणजे काँग्रेसचे नेते अहमद पटेल असल्याचे त्याने अंमलबजावणी संचलनालयाला सांगितले आहे. ईडीने दाखल केलेल्या चार्जशीटमधून ही माहिती समोर आली आहे. अहमद पटेल यांच्यासहीत त्यांचे कुटुंबाचे देखील नाव या घोटाळ्यात पुढे आहे. त्यामुळे आता काँग्रेस या प्रकरणात पुरती अडकत जात आहे.

याआधी या घोटाळ्यात ‘आरजी’ ने 2004 ते 2016 दरम्यान 50 कोटींची लाच घेतल्याचा दावा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) न्यायालयात केला आहे. संरक्षण दलाल सुशेन गुप्ता याने ‘आरजी’ नावाच्या व्यक्तीने लाच घेतल्याची कबुल केल्याचा दावा ईडीने न्यायालयात केला आहे. परंतु ‘आरजी’ चा फुल फॉर्म (व्यक्तीचे पूर्ण नाव) नक्की काय आहे हे सांगितले नसल्याचे ईडीने न्यायालयात सांगितले. तसेच ईडीने सुशेन गुप्ताच्या कोठडीचीही मागणी न्यायालयाकडे केली आहे.

























































