शिवराज सिंह चौहान यांच्या 18 वर्षांच्या सत्ताकाळात राज्यातील युवा पिढीचे वाटोळे; काँग्रेसचा निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आगामी 5 राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत होणार असल्याने तथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस पक्षात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. नवी दिल्ली येथील काँग्रेस मुख्यालयातील पत्रकार परिषदेत बोलताना माजी महिला काँग्रेस नेत्या शोभा ओझा यांनी मध्य प्रदेशमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने राज्यतील दोन कोटींपेक्षा अधिक युवांना त्रास सहन करावा लागत असल्याचे म्हणत सत्ताधारी भाजप सरकारवर टीका केली आहे. तसेच मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यावर निशाणा साधला आहे.

मध्य प्रदेशमधील शिवराज सिंह चौहान यांच्या 18 वर्षांच्या सत्ताकाळात बेरोजगारी, अनेक प्रकारच्या घोटाळ्यांमुळे राज्यातील युवा पिढीचे वाटोळे झाल्याचा आरोप शोभा ओझा यांनी केला. देशाची प्रगती युवा पिढीवर अवलंबून असते तसेच युवा पिढीच देशाचे वर्तमान आणि भविष्य ठरवते असे म्हटले जाते. मात्र मध्य प्रदेशमधील शिवराज सिंह यांच्या 18 वर्षांच्या कार्यकाळात युवा पिढी पूर्णपणे उध्वस्त झाली आहे, असा आरोप त्यांनी केला.

मध्य प्रदेशमधील जनतेने गेल्या 18 वर्षांमध्ये बेरोजगारी, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आणि अनेक घोटाळे पाहिले आहेत. दारू माफिया, भू – माफिया किंवा वाळू माफियांना सरकारचे संरक्षण मिळत आहे, असा आरोप त्यांनी केला. इतक्या वर्षांमध्ये झालेल्या घोटाळ्यांमुळे सरकारी नोकऱ्या देखील कोणाला मिळाल्या नाहीत. गेल्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये सुमारे 40 लाख तरुणांनी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये नोंदणी केली होती. आता यामध्ये सरकार केवळ 21 लोकांना नोकरी देऊ शकले ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे, असे शोभा ओझा म्हणाल्या.