
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
देशावर सर्वात जास्त काळ नेतृत्त्व करणाऱ्या काँग्रेसची आज निर्नायकी अवस्था झाली आहे. अनेक वरिष्ठ नेत्यांपैकी काहीजणांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. तर काही जणांनी राजीनामे दिले आहे. पक्षाच्या संकटात आता आणखी भर पडली आहे. निधीची चणचण जाणवत असल्याने काँग्रेसला आता खर्चात कपात करावी लागणार आहे. त्यामुळे पक्षाच्या विविध विभागांना देण्यात येणाऱ्या फंडात कपात करण्यात आली आहे.
काँग्रेस सेवादलाच्या मासिक खर्चात कपात करण्यात आली आहे. सेवा दलाला महिन्याच्या खर्चासाठी अडीच लाखांएवजी दोन लाख देण्यात येत आहेत. तसेच महिला काँग्रेस, नॅशनल स्टुडेंट युनियन ऑफ इंडिया आणि युवक काँग्रेसला खर्च कमी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात आलेले नाही. पक्षाच्या संघटनेतील कर्मचाऱ्यांना फक्त वेतन मिळाले आहे. तर पक्षाच्या सोशल मिडीया विभागात 55 कर्मचाऱ्यांपैकी 35 कर्मचारीच शिल्लक आहेत. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर या विभागातील अनेक कर्मचारी नोकरी सोडून गेले आहेत. शिल्लक असलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतनही उशीरा झाले आहे.
134 वर्षांची परंपरा असलेला काँग्रेस पक्ष सध्या विविध संकटांशी सामना करत आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आलेल्या नैराश्यातून पक्ष अजूनही सावरलेला नाही. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर अनेक वरिष्ठ नेत्यांनीही राजीनामे दिले आहेत. पक्षातील राजीनामा सत्र संपत नाही, तोच पक्षातील वरिष्ठ नेते, आमदार आणि कार्यकर्ते पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. त्यामुळे कर्नाटकसह मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार अचडणीत येण्याची शक्यता आहे. त्यातच आता पक्षासमोर नवे संकट उभे राहिले आहे. 134 वर्षे जुन्या असलेल्या या पक्षाला आता निधीचे संकट भेडसावत आहे.
पक्षाच्या या स्थितीमुळे काँग्रेसचे सरकार असलेल्या राज्यांनाही फटका बसत आहे. कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस आघाडीचे सरकार सध्या अडचणीत आले आहेत. तर मध्य प्रदेश आणि राजस्थानातही पक्ष अडचणीत येण्याची शक्यता आहे. गोव्यातही पक्षाच्या 10 आमदारांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेसमधील ही समस्या सोडवण्यासाठी कार्यकारिणीच्या आगामी बैठकीत कार्यवाहक अध्यक्ष नेमण्याबाबत चर्चा करणार असल्याचे पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले.
























































