स्वातंत्र्यलढय़ात तुमचा कुत्रा पण मेला नाही, खरगे यांच्या विधानाने भाजपचा संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाला काँग्रेसने स्वातंत्र्य मिळवून दिले. स्वातंत्र्यलढय़ात तुम्ही काय केले? तुमच्या घरातील कुत्रा पण मेला नाही, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केल्याने भाजप चांगलाच संतापला आहे. खरगे यांनी माफी मागावी, अशी जोरदार मागणी भाजपने राज्यसभेत केली. मात्र आपण विधानावर ठाम असून ते संसदेबाहेर केले होते, असे खरगे म्हणाले.

रविवारी अलवर येथे बोलताना खरगे म्हणाले होते, ‘‘देशाच्या स्वातंत्र्यलढय़ात काँग्रेस होती. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशासाठी प्राणार्पण केले. तुम्ही काय केले? देशासाठी तुमच्या घरातील कुत्रापण मेला नाही. कोणी शहीद झाले काय? नाही!’’ खरगे यांच्या या वक्तव्याचे भाजपच्या गोटात प्रचंड पडसाद उमटले आणि विषय राज्यसभेत गाजला.

राज्यसभेत गदारोळ

  • खरगेंनी माफी मागावी, अशी मागणी सत्ताधारी पक्षाने केली, तर खरगेंनी आपली बाजू मांडताना आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. त्यामुळे सभागृहाचे कामकाजही तहकूब करावे लागले.
  •   खरगेंचे विधान दुर्दैवी आणि द्वेषपूर्ण असून त्यांनी सभागृहाची तसेच भाजपची माफी मागावी, अशी मागणी सभागृह नेते व केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी केली. मात्र खरगेंनी ती फेटाळून लावत आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. वास्तविक, मी सभागृहाबाहेर बोललो आहे. त्याचा उल्लेख करू इच्छित नाही. मात्र मी जर खरे बोललो तर पळताभुई थोडी होईल, असा इशारा देत खरगे यांनी माफी मागण्यास सपशेल नकार दिला. त्यामुळे राज्यसभेचे कामकाज काही वेळापुरते तहकूब करावे लागले.