रत्नागिरीत एक दिवस आड पाणी, ते ही अपुरे आणि गढूळ पाणी; काँग्रेसचा रत्नागिरी नगरपरिषदेवर हंडामोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी शहरातील जनता सध्या पाणीटंचाईने त्रासलेली आहे. सध्या रत्नागिरी शहरामध्ये एक दिवस आड पाणीपुरवठा सुरू आहे. शहरातील अनेक भागांमध्ये एक दिवस आडही पुरेसे पाणी येत नसल्यामुळे आज काँग्रेसने रत्नागिरी नगरपरिषदेवर हंडा मोर्चा काढला.

राजीवडा परिसरातील महिला आज हंडाकळशी घेऊन रत्नागिरी नगरपरिषदेवर धडकल्या. शहरात सध्या एक दिवस आड पाणीपुरवठा सुरु आहे. मात्र एक दिवस आडही पाणी पुरेसे येत नाही. काही भागांमध्ये अतिशय गढूळ पाणी येते. या गढूळ पाण्यामुळे परिसरात रोगराई पसरली आहे. गढूळ पाण्याचे नमुने घेऊन महिला नगरपरिषदेमध्ये दाखल झाल्या होत्या. नगरपरिषदेत मुख्याधिकारी तुषार बाबर उपस्थित नसल्यामुळे मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाबाहेरच महिलांनी ठिय्या आंदोलन सुरू केल्याचे समजताच मुख्याधिकारी तुषार बाबर तात्काळ नगरपरिषदेत दाखल झाले. यावेळी तुषार बाबर यांनी आंदोलकांशी चर्चा केली. काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष अॅड. अश्विनी आगाशे यांनी शहरातील पाणी टंचाईची भीषणता यावेळी मांडली. आज फक्त एकाच प्रभागातील महिला आल्या आहेत. दर आठवड्याला आम्ही प्रत्येक प्रभागातील महिला घेऊन येऊ. शहरात नवीन पाणी पुरवठा योजना राबवण्यात आली. मात्र शहरवासियांना पुरेसे पाणी का मिळत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. साजिद पावसकर यांनी नवीन नळपाणी योजना करताना 24 तास पाणी देऊ असे जाहीर केले होते. पण 24 तास सोडा, एक तासही पाणी मिळत नसल्याची खंत त्यांनी मांडली. दीपक राऊत यांनी नवीन नळपाणी योजना ही बोगस असून अनेक ठिकाणी पाईप फुटत असल्याचा आरोप केला. महिला जिल्हाध्यक्षा अश्विनी आगाशे आणि सोशल मिडीयाच्या प्रदेश सचिव सुष्मिता सुर्वे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. यावेळी काँग्रेसच्या महिला प्रदेश सरचिटणीस रूपाली सावंत, कपील नागवेकर आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.