
देशाची राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनातील प्रमुख मागण्यांसाठी आता काँग्रेसही आक्रमक झाली आहे. मोदी सरकारने केलेले नवे तीन कृषी कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी काँग्रेस पुन्हा एकदा रस्त्यावर उतरली आहे.
शेतकरी विरोधी काळे कायदे व इंधन दरवाढीविरोधात नागपूर येथे राजभवनाला घातलेल्या घेरावात प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री ना. बाळसाहेब थोरात यांचे भाषण !#KisanAdhikarDiwas pic.twitter.com/5QSSTpjGu2
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) January 16, 2021
महाराष्ट्रात ठिकठिकाणी काँग्रेस नेत्यांनी शनिवारी आंदोलन केले. नागपुरात काँग्रेसने राजभवनाला घेराव घातला. केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घ्यावेत हीच प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले.
काँग्रेसने नागपुरातील राजभवनाच्या पश्चिम प्रवेशद्वाराजवळ मोर्चा काढला. काँग्रेसच्या मोर्चात अनेक ट्रॅक्टरही सहभागी झाले होते. काँग्रेसचे मंत्री आणि पदाधिकारी या मोर्चात उपस्थित होते.
विशेष म्हणजे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सध्या नागपूर मुक्कामी आहेत. राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून राज्यपालांपर्यंत आपला कृषी कायद्यांना असलेला विरोध दाखवण्यासाठी नागपूर येथे आंदोलन करीत असल्याची भूमिका काँग्रेस मांडत आहे. या आंदोलनात काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष भाई जगताप, महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार हेही सहभागी झाले होते.
केंद्र सरकार भांडवलदारांचे गुलाम झालेय
‘आम्ही फक्त आंदोलन करीत नाही. शेतकऱयांसाठी आधी काम करतो. केंद्रातील सरकारने काय केले? दिल्लीत एवढे दिवस शेतकरी आंदोलन करीत आहेत. शेतकऱयांचा शेतीमाल स्वस्तात खरेदी करण्याची आणि साठवण्यासाठी काही उद्योगपतींनी तयारी केलीय.
केंद्र सरकार भांडवलदारांचे गुलाम झाले आहे. शेतकऱयांनाही भांडवलदारांचे गुलाम करायला निघालेय. केंद्र सरकारच्या कायद्याला आम्ही राज्यात मोडून काढू. जे शेतकऱयांच्या हिताचे असेल तेच राज्यात करू,’ असे प्रतिपादन काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केले.