
श्रीनगरच्या लाल चौकात आज ऐतिहासिक घटना घडली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा श्रीनगरमध्ये पोहचली असून त्यांनी लाल चौकात ‘वंदे मातरम्’च्या घोषात हजारो देशबांधवांच्या उपस्थितीत तिरंगा फडकवला. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर तब्बल 75 वर्षांनी राहुल गांधी यांच्या रूपाने काँग्रेस नेत्याने श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवला आहे.
कन्याकुमारीपासून सुरू झालेली राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा आता अंतिम टप्प्यात असून उद्या सोमवारी ती श्रीनगरमध्ये संपणार आहे. तत्पूर्वी, आज सकाळी ‘भारत जोडो’ यात्रेत काही अंतर चालल्यानंतर दुपारी 12 वाजता राहुल गांधी लाल चौकात पोहोचले. यावेळी काँग्रेस नेत्यांसह त्यांनी प्रथम ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत गायले. त्यानंतर त्यांनी तिरंगा डौलाने फडकवला. या रोमांचकारी कार्यक्रमानंतर राहुल गांधी ‘भारत जोडो’ यात्रेच्या पुढील प्रवासासाठी रवाना झाले. यावेळी त्यांच्यासोबत प्रियंका गांधी- वढेरा याही उपस्थित होत्या.
31 वर्षांपूर्वी मुरली मनोहर जोशी आणि मोदींनी फडकवला होता तिरंगा
श्रीनगरच्या लाला चौकात 31 वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन वरिष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी 26 जानेवारी 1992 रोजी तिरंगा फडकवला होता. यावेळी त्यांच्यासोबत नरेंद्र मोदीदेखील उपस्थित होते.
…तर काँग्रेस सहन करणार नाही – सुक्खू
देशभरातील समाजात तिरस्कार वाढत असल्याचे पाहून राहुल गांधी यांनी कन्याकुमारीपासून ते कश्मीरपर्यंतची ‘भारत जोडो’ यात्रा सुरू केली आहे. तिरस्कार सोडून एकत्र या, असे ते या यात्रेच्या माध्यमातून आवाहन करत आहे. त्यामुळे काणीही देशाच्या स्वातंत्र्याला धक्का लावला तर काँग्रेस ते सहन करणार नाही, असा इशारा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी यावेळी दिला.


























































