
दिल्लीचे मंत्री व आप आमदार सत्येंद्र जैन यांचा तुरुंगात मसाज घेत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. दरम्यान मसाज करणारी व्यक्ती ही फिजियोथेरपिस्ट नसून तुरुंगातीलच एक कैदी असल्याचे तुरुंग प्रशासनाकडून सांगण्यात आले. सदर कैदी हा बलात्काराच्या गुन्ह्यात तुरुंगात कैद आहे. या घटनेवरून काँग्रेसने आपवर तिखट शब्दात टीका केली आहे.
”आप हा एक सडका व आजारी पक्ष आहे. आपल्याच मुलीवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीकडून सत्येंद्र जैन हे मसाज करून घेत आहे. यावरून या पक्षातील लोकांची सडकी मानसिकता दिसते. जगासमोर स्वच्छ भ्रष्टाचार मुक्त राजकारणाचा दावा करणाऱ्या या आपच्या नेत्यांचा खरा चेहरा आता संपूर्ण जग बघत आहे. असे राजकारण हिंदी चित्रपटातही पाहिलेले नाही’, अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेडा यांनी केली आहे.
दरम्यान मसाच्या व्हिडीओनंतर आता सत्येंद्र जैन यांचा तुरुंगातील जेवतानाचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात सत्येंद्र जैन यांची जेवणातही चंगी असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांच्यासाठी तुरुंगातील एक कैदी ताटभरून सॅलाड आणून देताना या व्हिडीओत दिसतो. तसेच ते वेगवेगळी फळं खातानाही दिसत आहेत.
तुरुंगात फळं भाज्या मिळत नसल्याचा केलेला दावा
सत्येंद्र जैन यांनी त्यांना तुरुंगात फळं व सॅलाड दिले जात नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे तुंरुंगात त्यांचे वजन 28 किलोने कमी झाल्याचा दावाही त्यांच्या वकीलाने केला आहे. या दाव्यानंतर काही तासातच सत्येंद्र जैन यांचा तुरुंगात जेवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला.



























































