ड्रग माफियांची माहिती न देताच कंगना परत गेली, काँग्रेसचा पलटवार

बॉलिवूडच्या ड्रग कनेक्शन संदर्भात आपल्याकडे माहिती असल्याचा दावा करणारी अभिनेत्री कंगना राणावत बॉलिवूड व ड्रग माफियांची माहिती न देताच हिमाचल प्रदेशला परत का गेली, असा प्रश्न आज महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीने उपस्थित करण्यात आला. अमली पदार्थांच्या संदर्भातील गुन्ह्यांची माहिती दडवणे हा सुद्धा गुन्हाच आहे याकडे काँग्रेसने पोलिसांचे लक्ष वेधले आहे.

बॉलिवूडचे ड्रग माफिया कनेक्शन व त्यासंदर्भातील गुन्ह्यांची माहिती तिच्याकडे आहे, असे कंगनाने जाहीरपणे सांगितले होते. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग कनेक्शन उघड होताच एनसीबीने याप्रकरणी चौकशी सुरु केली. कंगनाने एनसीबीला अमली पदार्थांच्या संदर्भातील माहिती देणे आवश्यक होते. पण कंगनाने कसलाही संदर्भ नसताना मुंबई पोलिसांची यथेच्छ बदनामी केली. कंगनाकडे बॉलिवूड व ड्रग कनेक्शनची जी माहिती आहे ती तिने एनसीबीकडे द्यावी, अशी आम्ही मागणीही केली होती. पण मुंबईत काही दिवस राहून कंगनाने ही माहिती दिली नाही हे आश्चर्यकारक आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले.

कंगना भाजपचे बाहुले

मुंबईत काही दिवस राहून कंगनाने तिच्याकडील ड्रग माफियांची माहिती का दिली नाही. या सर्व प्रकरणातून कंगना ही भाजपच्या हातातील बाहुले असून महाराष्ट्राला बदनाम करण्याच्या कटाचा ती भाग आहे, हे आता स्पष्ट झाले, असेही सावंत म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या