महायुती सरकार म्हणजे एसआयटी सरकार; बदलापूरप्रकरणी काँग्रेसचा मंत्रालयावर धडक मोर्चा

राज्यात कोणतीही अत्याचाराची घटना घडली की महायुती सरकार विशेष चौकशी पथक (एसआयटी) नेमल्याची घोषणा करते. परंतु कारवाई काहीच केली जात नाही. महायुती सरकार म्हणजे एसआयटी सरकार आहे, असा आरोप करत काँग्रेस पक्षाने आज बदलापूर घटनेच्या निषेधार्थ मंत्रालयावर धडक मोर्चा काढला.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी मोर्चा अडविल्यानंतर  महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ महायुती सरकारविरोधात आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. बदलापूर प्रकरणात एसआयटी नेमली तरी न्याय मिळेल का, असा संतप्त सवाल या वेळी वडेट्टीवार यांनी केला. मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड, आमदार अस्लम शेख, काँग्रेस प्रवत्ते सचिन सावंत यांच्यासह शेकडो काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.

मुख्यमंत्र्यांच्या जिह्यात चिमुकल्यांवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या जिह्यात गुन्हे 57 टक्क्यांनी वाढले आहेत. पण मुख्यमंत्र्यांचे त्याकडे लक्ष नसल्याचे स्पष्ट करत वडेट्टीवार यांनी सरकारच्या कारभारावर या वेळी नाराजी व्यक्त केली.