गृहमंत्री शहा म्हणाले… तर कर्नाटकात दंगली होतील, काँग्रेसची पोलिसांत तक्रार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेस पक्ष निवडून आल्यास कर्नाटकात दंगली उसळतील, असे अत्यंत चिथावणीखोर वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. यानंतर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असून शहा यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. शहा यांचे विधान प्रक्षोभक, द्वेष पसरविणारे आणि विरोधकांची बदनामी करणारे असून त्यांच्यावर एफआयआर नोंदवून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू असून तेरडल येथील सभेत बोलताना गृहमंत्री अमित शहा यांनी प्रक्षोभक वक्तव्य केले. कर्नाटकात काँग्रेस सत्तेवर आल्यास घराणेशाहीचे राजकारण मोठय़ा प्रमाणात सुरू होईल. राज्यात दंगली होतील, असे शहा म्हणाले.

शहा देशाचे गृहमंत्री आहेत
काँग्रेस नेते रणदीपसिंह सुरजेवाला, डॉ. परमेश्वर आणि कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी बंगळुरू येथे हाय ग्राऊंड पोलीस ठाण्यात जाऊन अमित शहांविरुद्ध तक्रार दाखल केली. जर सामान्य व्यक्तीने असे वक्तव्य केले असते तर पोलिसांनी त्याला अटक केली असती. अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत. ते असे वादग्रस्त विधान कसे करू शकतात, असा सवाल शिवकुमार यांनी केला. अमित शहांचे विधान प्रक्षोभक, द्वेष पसरविणारे आणि काँग्रेसची बदनामी करणारे आहे. त्यांच्यावर एफआयआर दाखल करावा, अशी मागणी सुरजेवाला यांनी केली. दरम्यान, अमित शहांविरुद्ध निवडणूक आयोगाकडेही तक्रार दाखल करण्यात आली आहे.