
मुंबईतील आर/दक्षिण परिसरातून वाहणा-या पोईसर नदीकाठी संरक्षक भिंत बांधण्यासाठी, त्या भागातील 29 बांधकामे हटविण्याची कारवाई काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. याठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेत मुंबई महानगरपालिकेने अवघ्या 15 दिवसात ही भिंत बांधून पूर्ण केली आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात कांदिवलीतील डहाणुकरवाडी परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
कांदिवली पश्चिमेच्या डहाणूकर वाडी येथून वाहणार्या पोईसर नदीचा उगम संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्य क्षेत्रातील डोंगर रांगामध्ये होऊन ही नदी मालाड पूर्वच्या क्रांतीनगर झोपडपट्टीतून पुढे प्रवेश करते. अनेक प्रभागातून वाहत येणाऱ्या या नदीचा प्रवाह डहाणूकर वाडीत वसलेल्या बेट वस्तीमुळे दोन प्रवाहात विभागला जातो. पुढे दोन्ही प्रवाह एकत्र येऊन मालाड पश्चिमेच्या मार्वे खाडीला जाऊन मिळतात.
डहाणूकरवाडी वस्तीमुळे विभाजित होणाऱ्या दोन प्रवाहापैकी ‘ब’ प्रवाह हा नदी पात्रातील झोपड्यांच्या अतिक्रमणामुळे खूप अरुंद होतो. तसेच त्या ठिकाणी बांधलेल्या पुलामुळे पावसाच्या नैसर्गिक प्रवाहास अडथळा निर्माण होतो. परिणामी जोरदार पावसाच्यावेळी पुराचे पाणी शिरून डहाणूकर वाडी परिसरातील रहिवाश्यांना बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागते.
स्थानिक रहिवाश्यांना मागील काही वर्षे पावसाळ्यात अशा कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागत असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महानगरपालिकेला वारंवार विनंती केली होती. प्रशासनाने देखील वेळोवेळी निरनिराळे प्रयत्न केले, विविध उपाययोजना हाती घेतल्या. त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी नदीपात्राचे रुंदीकरण करण्याचे काम सन 2018 पासून करण्याचे नियोजित होते. मात्र, या ठिकाणच्या झोपडीधारकांच्या विविध मागण्यांमुळे व तांत्रिक व प्रशासकीय अडचणीमुळे आर/दक्षिण विभागाला ‘ब’ प्रवाहपात्रातील झोपड्या हटविणे शक्य होत नव्हते. परिणामी पर्जन्यजल वाहिन्या विभागाला देखील या ठिकाणी नदीपात्राचे नियोजित रुंदीकरण करता आले नाही.
याप्रकरणी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात दिनांक 9 मे 2022 रोजी सर्व संबंधितांबरोबर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यावेळी वेलरासू यांनी याप्रकरणी तातडीने तोडगा काढण्यासाठी उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांना निर्देश दिले.
यानंतर आर/दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त संध्या नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली या 29 झोपड्या दिनांक 20 मे 2022 रोजी तोडण्यात आल्या. झोपड्यांचा ढिगारा हटवण्याचे आणि या ठिकाणी वसलेल्या उर्वरित झोपड्यांना जोरदार पावसाच्या पाण्याचा फटका बसू नये म्हणून संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्याची कार्यवाही पर्जन्य जलवाहिनी विभागाने ताबडतोब सुरू केली. सर्व आव्हाने पार करून महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाने अवघ्या 15 दिवसात संरक्षक भिंतीचे काम युद्ध पातळीवर करीत 11 जूनला पूर्णत्वास नेले.

























































