
मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाने (एमएमआरसी) राज्याच्या वन महामंडळाच्या सहकार्याने मुंबईत लावलेली मियावाकी जंगले ही आता चांगलीच बहरली आहे. जपानचे उच्चायुक्त डॉ. यासुकाता फुकाहोरी यांनी आज गोरेगाव येथील मियावाकी जंगलाला भेट दिली. डॉ. फुकाहोरी यांनी या कार्याबद्दल एमएमआरसीची प्रशंसा केली.
गोरेगाव पश्चिमेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानात ही मियावाकी जंगले लावली गेली आहेत. त्यासाठी फक्त 18 दिवस वृक्षारोपण केले गेले. कमी जागेत निर्माण करता येणाऱ्या जंगलांचे मियावाकी तंत्र हे जपानमधील आहे. गोरेगावातील या मियावाकी जंगलात 9003 झाडे लावली गेली आहेत. त्यात पिलखन, बदाम, शिसव, बिहडा, करंज, पिंपळ, वावळा, कांचन, कदंब, पळस, आवळा, शिवन, बहावा, काजू, पांगरा, कांचन ब्लू, हातगा, बोर, हिरडा, शामनी, पांढरे कांचन, पेरू, काशिद, मुचकुंद, सारू, साग, हिरवा बांबू, वड, पारस पिंपळ, बेल आदी 400 जातींच्या झाडांचा समावेश आहे. आता ही झाडे 15 ते 20 फुटांपर्यंत वाढली आहेत. या पाहणीप्रसंगी एमएमआरसीचे आर. रमणा, अजय फुलमाळी, जपानी उच्चायुक्तांचे सल्लागार कुणाल चोणकर आदी उपस्थित होते.




























































