कंटेनर उलटून क्लिनरचा मृत्यू, धामणगाव जवळील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर उलटून क्लिनरचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तालुक्यातील धामणगावजवळ वळण रस्त्यावर दरम्यान घडली. श्रीकांत अंकुश माने (26) असे मयत व्यक्तिचे नाव असून तो आष्टी तालुक्यातील सुरुडी येथील रहिवासी आहे.

चालक परसराम मिसाळ आणि क्लिनर श्रीकांत माने हे दोघे सुरुडी येथील असून (क्र. MH 46, AR. 3777) हा कंटेनर घेऊन बीडकडे जात असताना तालुक्यातील धामणगावजवळ वळण रस्त्यावर झिंजुर्क वस्ती नजीक चालक मिसाळ यांचा कंटेनरवरील ताबा सुटल्याने कंटेनर उलटला. यात केबिनमधील क्लिनर श्रीकांत दबला गेल्याने जागीच मृत्यू झाला.

श्रीकांतच्या पश्चात आई, पत्नी असा परिवार आहे. साधारण पाच वर्षांपूर्वी श्रीकांत यांच्या वडिलांचा पुण्याजवळ अपघात झाला होता. यानंतर घरची जबाबदारी श्रीकांतवर आली होती. सुरवातीला तो गावात गंवड्याच्या हाताखाली काम करायचा. मात्र दोन महिन्यांपासून तो कंटेनरवर क्लिनर म्हणून काम करत असे. घरातील कर्त्या पुरुषांचे अपघाती निधन झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार पोपट मंजुळे करीत आहेत.