‘समृद्धी’च्या पुलाखाली अडकला कंटेनर, कोपरगाव इंटरचेंजजवळील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर-मनमाड महामार्गावरील समृद्धी महामार्गाच्या कोपरगाव इंटरचेंजवरील उड्डाणपुलाखाली एक कंटेनर अडकून पडला. पुलाची उंची कमी असल्याने ही घटना घडली असून, समृद्धी महामार्गाच्या अधिकाऱयांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे कंटेनरचालकाने सांगितले.

‘समृद्धी’ महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र, समृद्धी महामार्गामुळे नगर-मनमाड महामार्गावरील प्रवाशांना मोठय़ा अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. समृद्धी महामार्गाच्या पुलाची उंची कमी आहे. नगर-मनमाड महामार्गावरील कोपरगाव इंटरचेंजजवळ चेन्नईहून ऑइल रिफायनरीचे मशीन घेऊन धुळ्याच्या दिशेने जात असलेला कंटेनर उड्डाणपुलाला अडकला. रस्त्याचे काम करणाऱया संबंधित अधिकाऱयांना संपर्क केला असता, त्यांनीही प्रतिसाद दिला नसल्याचे कंटेनरचालक मोहम्मद अली याने सांगितले.

अखेर मंगळवारी सकाळी पोकलॅनच्या साहाय्याने खड्डा करून हा कंटेनर उड्डाणपुलाखालून बाहेर काढण्यात आला. सुदैवाने नगर-मनमाड महामार्ग रुंद असल्याने वाहतूककोंडी झाली नाही. समृद्धी महामार्गाचे काम सुरू असताना या पुलाची उंची वाढविण्याची गरज होती. मात्र, रस्त्यापासून पुलाची उंची कमी असल्याने उंच वाहने अडकून पडणार आहेत. समृद्धी महामार्गाचे ठेकेदार व एमएसआरडीसीच्या अधिकाऱयांनी याकडे लक्ष देण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.