
सामना प्रतिनिधी, न्हावाशेवा
न्हावाशेवा बंदर कामगार संघटनेअंतर्गत जेएनपीटीवर कंत्राटी कामगारांच्या प्रमुख मागण्यांसाठी मंगळवार २६ जून रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या कुटुंबीयांसह धडक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात जेएनपीटी कंत्राटी महिला कामगार व पुरुष सर्वांनी आपल्या न्याय हक्कांसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जेएनपीटी प्रशासन भवनासमोर यावेळी कामगार व त्यांच्या कुटुंबीयांनी ठिय्या मांडून वाहतूक रोखून धरली होती.
कंत्राटी कामगारांच्या वारसांना त्यांच्या निवृत्तीनंतर बदली कामगार म्हणून नोकरीत सामावून घ्या,जेएनपीटी प्रकल्पग्रस्त दाखल सादर करण्याची अट रद्द करण्यात यावी, निवृत्तीच्या वेळी ग्रॅज्युटीचे पेमेंट मिळाले पाहिजे व समान कामाला समान वेतन मिळाले पाहिजे या चार प्रमुख मागण्या या कंत्राटी कामगारांच्या वतीने जेएनपीटी प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. या मोर्चात कामगार नेते कॉ.भूषण पाटील, न्हावाशेवा बंदर कामगार संघटनेचे अध्यक्ष दिनेश घरत, कामगार नेते गणेश घरत, माजी अध्यक्ष मधुकर कोळी, प्रशांत भगत आणि कामगार व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.




























































