
जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हायरसचा फटका आरोग्यापासून ते अर्थव्यवस्थेपर्यंत सगळ्यांनाच बसला आहे. जगभरातले व्यापार ठप्प झाले असून अनेक मोठमोठ्या कंपन्यांना यामुळे नुकसान झालं आहे. या कंपन्यांमध्ये अॅप्लिकेशनवरून कॅबसेवा पुरवणाऱ्या कंपन्यांचाही समावेश आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उबेर, ओला या कंपन्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोना व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी या कॅब कंपन्यांनी आपल्या अॅप्लिकेशनमध्ये काही बदल केले आहेत. दोन अनोळखी माणसांचा संपर्क येऊन कोरोनाच्या प्रादुर्भावाला आमंत्रण मिळू नये यासाठी ओला आणि उबेर या कंपन्यांनी आपली शेअरिंग राईड ही सुविधा बंद केली आहे. त्यामुळे जे प्रवासी ओलाच्या शेअर आणि उबेरच्या पूल या सुविधेचा लाभ घेत होते, ती सुविधा आता काही काळ उपलब्ध होणार नाही.
या सुविधांमध्ये एकाच मार्गावरून प्रवास करणारे दोन ते चार प्रवासी एक राईड शेअर करू शकतात. त्यामुळे राईडसाठी येणारा खर्चही विभागला जातो. त्यामुळे अनेकजण बऱ्याचदा या सेवेचा वापर करतात. पण, या सुविधेतले बहुतांश प्रवासी हे एकमेकांसाठी अनोळखी असतात. त्यामुळे सद्यपरिस्थितीत संक्रमण रोखण्यासाठी या सुविधा रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती या अॅप्लिकेशन कंपन्यांनी दिली आहे. शेअरिंग राईड ही सुविधा बंद असली तर मायक्रो, मिनी, प्राईम, रेंटल आणि आउटस्टेशन अशा सर्व सुविधा प्रवासासाठी खु्ल्या असतील अशी माहिती कॅब अॅप्लिकेशनतर्फे देण्यात आली आहे.




























































